तीन महिन्यांपासून पदोन्नतीची प्रतीक्षा;अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त

दरवर्षी मे-जून महिन्यात राज्यभरात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आणि पदोन्नतीचे वारे वाहू लागतात. पोलीस दलातही याच काळात अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नती करण्यात येते. सहायक पोलीस उपनिरीक्षकापासून ते पोलीस अधीक्षक, उपायुक्तांपर्यंत सर्वाच्या बदल्या झाल्या आणि बढतीही मिळाली आहे. मात्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्त, उपअधीक्षक किंवा विभागीय पोलीस अधिकारीपदी देण्यात येणाऱ्या बढती यादीवर अद्याप राज्य सरकारने निर्णय घेतलेला नाही. विशेष म्हणजे पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले अनेक अधिकारी विनाबढती सेवानिवृत्त झाले असल्याने पोलीस दलात सरकारविरोधी सूर उमटू लागले आहेत.

राज्यभरात अडीचशेवर सहायक पोलीस आयुक्त, विभागीय अधिकारी किंवा उपअधीक्षकांची पदे रिक्त आहेत. ही पदे सरळसेवा भरती आणि पदोन्नतीतून भरण्यात येतात. सरळसेवा भरती होऊन वर्ष उलटले आहे. त्यामुळे सध्यातरी नव्याने भरती होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे रिक्तपदांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरवर्षी ही मे-जून महिन्यात ही पदे पदोन्नतीने भरण्यात येतात. गेली अनेक वष्रे पोलीस निरीक्षक म्हणून काम करणारे अधिकारी आणि पदोन्नतीसाठी पात्र असलेल्यांना बढती देण्यात येते. आजवर मुदतीमध्ये बढतीवर निर्णय घेण्यात येत होता. परंतु विद्यमान सरकार आल्यापासून ‘एसीपी’च्या बढतीवर संकट आले आहे. तीन महिने उलटूनही वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावरून सहायक पोलीस आयुक्त, उपअधीक्षकपदी पदोन्नतीसाठी राज्यभरातील २४० अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी अनेकजण पदोन्नतीच्या प्रतीक्षेत सेवानिवृत्त झाले असून, आता केवळ २२२ अधिकारी उरले आहेत. सरकारने पदोन्नतीची यादी जाहीर करण्यास अधिक विलंब केल्यास पात्र अधिकाऱ्यांपैकी अनेकजण सेवानिवृत्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सेवानिवृत्त झालेले अधिकारी

जमाल पटेल, संजय पाटील, विलास चव्हाण, निशिकांत पाटील, मोहन प्रजापती, राजेंद्र काळे, शिवाजी शिंदे, श्रीरंग लंगे, दीनकर कामे, दिलीप पाटील, रामदास चौधरी, भास्कर पगार, रामप्रसाद धुळे, अनिल सिंग राजपूत हे अधिकारी सरकारच्या उदासीन कारभारामुळे सहायक पोलीस आयुक्तपदासाठी पात्र असतानाही पदोन्नती मिळण्यापूर्वीच सेवानिवृत्त झाले.

पोलीस महासंचालकपदाचा नुकताच पदभार स्वीकारला असून पावसाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे यापूर्वीची प्रलंबित कामे समजून घेण्यात येत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती देण्यासंदर्भात प्रस्तावावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.

सतीश माथूर, पोलीस महासंचालक