बैठकीचे निमंत्रण देवून महापौर न आल्याचा आरोप

नागपूर:  अतिक्रमण निर्मूलन कारवाईच्या मुद्यावर महापौरांनी बैठक घेण्याचे सांगूनही ते स्वत:च न आल्याने संतापलेल्या अपंगांनी महापालिका कार्यालयात सोमवारी धरणे दिले. आंदोलनादरम्यान एकाने अंगावर रॉकेल टाकल्याने तणाव वाढला होता. पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. उपायुक्तांशी चर्चा झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शहरातील अतिक्रमण काढण्यात येत आहे. यात  काही अपंगांची दुकाने हटवण्यात आली. या मुद्यावर अपंगांनी महापौर संदीप जोशी यांच्याकडे दाद मागितली. जोशी यांनी या मुद्यावर चर्चा करण्यासाठी सोमवारी बैठक बोलावली होती. त्यानुसार अपंग बांधव महापालिकेत आले. मात्र जोशी आलेच नाही. त्यामुळे अपंग संतापले व महापालिकेतच धरणे देऊ लागले. प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर अपंगांचा पारा चढला. एकाने अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्याला लगेचच पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान उपायुक्त महेश मोरोणे यांना अपंगाशी चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आले. त्यांनी महापौरांची तब्यात ठीक नसल्याने ते येऊ शकले नाही असे सांगितले.

गांधीबाग उद्यानाजवळ मागील २० वर्षांपासून चहा विक्री करणाऱ्या अपंगाचे दुकान अतिक्रमण निर्मूलन पथकाने तोडले. महापौरांनी त्यांच्यासोबत बैठक निश्चित केली होती. ती झाल्यावर ही कारवाई झाली असती तर समजण्यासारखे होते. पण त्यापूर्वीच कारवाई झाल्याने अपंग संतापले, जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत किमान आमचे अतिक्रमण काढू नये, अशी विनंती त्यांनी केली. याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन मोरोणे यांनी दिले.