आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातील २५१ किमी अंतर यशस्वीरित्या पार

नागपूरचा धावपटू अतुल चौकसेने जगातील सर्वात कठीण मानली जाणारी आफ्रिकेच्या सहारा वाळवंटातील २५१ किमी अंतराची शर्यत यशस्वीरित्या पूर्ण करत इतिहास घडवला. अतुल शर्यत पूर्ण करून नागपुरात आला असता त्याने पत्रकार परिषदेत अनुभव सांगितले. तो  शर्यत पूर्ण करणारा विदर्भातील पहिला धावपटू ठरला.

अतुलने सांगितले की, स्पर्धेत अनेक कठीण आव्हाने समोर आली होती. मात्र, सर्व आव्हानांवर मात देत स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. ८ एप्रिलला स्पर्धेला सुरुवात झाली असून १४ एप्रिलला समारोप झाला. स्पर्धेत पन्नास देशातील अकराशे धावपटू  सहभागी झाले होते.भारताकडून अतुल आणि मुंबईचा अर्जुन कृष्णकुमारने प्रतिनिधित्व केले. सर्व सहभागी धावपटूंना स्पर्धा सहा टप्प्यात पूर्ण करायची होती.

जवळपास अकराशे आठ धावपटूंनी ही स्पर्धा पूर्ण केली. ज्यामध्ये मी ५६० वे स्थान प्राप्त केले. स्पर्धेत पन्नास महिलांचा सहभाग होता. शिवाय शर्यतीत ऑलिम्पिक पदक विजेते धावपटू देखील होते. स्पर्धेचा मार्ग अतिशय खडतर असून तापमान ५५ अंश सेल्सिअस होते. वाळवंट आणि वाळू चांगलीच तापलेली होती. त्यामुळे उन्हाचा तडाखा जास्त जाणवत होता.

शिवाय रात्री मार्गात जागोजागी विषारी साप, विंचू दिसून येत होते.अशात पाठीवर २५ किलो वजनाची बॅग घेऊन धावणे फारच कठीण होते. मला आनंद आहे की, ही शर्यत मी निर्धारित वेळेत पूर्ण केली.