परवाना बंधनकारक केल्याच्या निर्णयाचा विरोध; कोटय़वधींची उलाढाल ठप्प

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यापारी व दुकानदारांना परवाना बंधनकारक केल्याच्या निर्णयाच्या विरोधात आज बुधवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. परंतु संपामुळे कोटय़वधींची उलाढाल ठप्प झाली.

व्यापाऱ्यांची  शिखर संघटना नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्सने (एनव्हीसीसी) आयुक्त मुंढे यांनी लादलेल्या निर्णयाच्या विरोधात बंदची हाक दिल्याने बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. त्यामुळे सकाळपासून सर्वत्र शुकशुकाट बघायला मिळाला. सीताबर्डी, महाल, जरीपटका, सदर, शहीद चौक, किराणा ओळ, नंगापुतळा चौक, सराफा बाजार, होलसेल क्लॉथ मार्केट, गांधीबाग, धरमपेठ, इतवारी अशा शहरातील प्रमुख बाजारपेठा कडकडीत बंद होत्या. एनव्हीसीसीचे अध्यक्ष अश्विन मेहाडिया यांच्या नेतृत्वात सकाळी पदाधिकाऱ्यांनी जनता चौक, व्हेरायटी चौक, लक्ष्मीभवन चौक, मस्कासाथ, इतवारी, सराफा बाजार, शहीद चौक, नंगापुतळा चौक आणि होलसेल कापड बाजारात धरणे दिले. यावेळी सम-विषम पद्धत बंद करावी, यामुळे व्यावसाय होत नाही. तसेच व्यापाऱ्यांची करोना चाचणी आणि नवे परवाने घेण्याची अट मागे घ्यावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी  केली.

व्यायामशाळा सुरू करण्यासाठी महापौर आंदोलनात

गेल्या पाच महिन्यांपासून शहरातील सर्व जिम (अत्याधुनिक व्यायामशाळा) बंद आहेत. त्यामुळे या क्षेत्राशी निगडित हजारो लोक बेरोजगार झालेआहेत. जिमचालकांना मोठा आर्थिक फटका बसला असून बँकेतून घेतलेल्या कर्जाचे हप्ते देणे कठीण होत आहेत. त्यामुळे जिम सुरू करण्याची परवानगी द्यावी, यासाठी महापौर संदीप जोशी यांनी संविधान चौकात आयोजित विरोध प्रदर्शनात सहभाग नोंदवला. यावेळी संदीप जोशी यांनी व्यायाम करून अभिनव आंदोलन केले. शहरात दारू दुकाने सुरू आहेत मात्र ज्या व्यायामशाळेमुळे आरोग्य चांगले राहते त्याच  बंद असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. पुढील आठ दिवसात जिम सुरू झाले नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करू,असा इशाराही जोशी यांनी दिला.