परिणामांविषयी साशंकता; तरतुदी अत्यंत सामान्य; बहुतांश सूचनांबाबत नाविन्याचा अभाव
उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणारे मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ची अंमलबजावणी करणार आहे. मात्र, या योजनेत मुळातच त्रुटी असल्याचे आता समोर आले आहे. उन्हाळा सुरू होण्याआधी जानेवारीपासून या योजनेची अंमलबजावणी आवश्यक असताना, प्रत्यक्षात आता पारा ३९ अंशावर गेल्यानंतर त्याची अंमलबजावणी केली जात आहे. विशेष म्हणजे, या योजनेत उन्हापासून बचावासाठी करण्यात आलेल्या तरतुदी अतिशय सामान्य आहेत. त्यामुळे या तरतुदींची अंमलबजावणी आणि त्यानंतर होणाऱ्या परिणामांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षी देशात उष्णतेच्या तीव्र लाटेत सुमारे अडीच हजार लोकांचा बळी गेला. त्याची गंभीर दखल घेऊन नागपूरसह राज्यातील तापमानाचा पारा उंचावणाऱ्या शहरात ही योजना राबवली जात आहे. न्युयॉर्कस्थित नॅशनल रिसोर्सेस डिफेन्स कौन्सिल या संस्थेने ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार केला आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी अनेक शासकीय विभाग एकत्र येणार आहेत. योजना आणि योजनेची अंमलबजावणी इथपर्यंत सगळे ठीक आहे. तरीही ज्या शहरांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे, त्या शहरांचा अभ्यास या संस्थेने केला का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक शहराची तापमानाची परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे योजनेत एकवाक्यता असून चालणार नाही. या योजनेत उन्हाळ्यात लोकांनी काय करावे आणि काय करू नये, यावर अधिक भर देण्यात आला आहे, पण सर्वसामान्यांनाही अलीकडे या सर्व गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे वेगळे असे यात काहीही नाही.
उष्णतेच्या लाटेची माहिती पाच दिवस आधीच देण्यासाठी भारतीय हवामान खात्याच्या संकेतस्थळावर विशेष विभाग सुरू केला जाणार आहे. पुढील आठवडय़ात कोणत्या दिवशी किती तापमान, याचा सविस्तर अंदाज, तापमान ४३ अंशावर असल्यास सावधानतेचा इशारा, ४५ अंशावर तापमान असल्यास ध्वनिक्षेपकांवर सूचना याशिवाय शहरात ३०० ठिकाणी पाणपोई उभारणार, सार्वजनिक उद्याने दुपारी सुरू ठेवणार, उष्माघाताच्या उपचारासाठी सर्व रुग्णालये सुसज्ज ठेवणार, रस्त्यावर काम करणाऱ्या मजूरांसाठी शीत निवारा, या सर्व उपाययोजना निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, अंमलबजावणीच्या दृष्टीने अनेक त्रुटी यात येणार आहेत. काही वर्षांपूर्वी अहमदाबादेत उष्णतेच्या लाटेमुळे ३०० लोकांचा बळी गेला होता, त्यावर उपाय म्हणून सर्वप्रथम तेथे २०१३ मध्ये ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ राबवला आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाली. सध्या संपूर्ण शहरात सिमेंट रस्त्यांचे जाळे उभारले जात आहे. तापमान वाढीसाठी ते कारणीभूत ठरणार आहे. त्यामुळे त्यानुसार ‘हिट अ‍ॅक्शन प्लॅन’ सुद्धा बदलावा लागणार आहे.

इतरही गोष्टीची अंमलबजावणी करा -अक्षय देवरस
उन्हाळ्यात काय करावे आणि काय करू नये हे लोकांना माहिती असते. त्यामुळे ते लोकांना सांगण्याऐवजी शहरांचा अभ्यास करून योजना आखणे अपेक्षित आहे. शहरात पाणपोई लावणार हे ठीक, पण ती पाणपोई सांभाळणारे उन्हातच राहतील. तेव्हा त्यांच्या आरोग्याचे काय? रस्त्यावरील मजूरांसाठी शीत निवारा उभारणार, पण उड्डाणपूल किंवा इतरत्र राहणाऱ्या भिकाऱ्यांसाठी काय? लोक बाहेर जातील, त्यामुळे साहाजिकच सायकलरिक्षा चालतील, अशावेळी त्यांच्या आरोग्याचे काय? मुळातच विदेशात तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते तेव्हा तेथे वाढीव तापमानाचा अंदाज आल्याबरोबर कार्यालये, मॉल्स बंद ठेवली जातात. विदेशापेक्षा कितीतरी पटीने अधिक तापमान भारतात असते. त्यामुळे अशा गोष्टीची अंमलबजावणी आधी करणे गरजेचे आहे. लंडनमध्ये कबूतराच्या गळ्यात डिवाईस टाकून त्याद्वारे प्रदूषणाचा अंदाज घेऊन त्यानुसार प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी योजना आखली जाते. भारतात जर विदेशाच्या धर्तीवर ‘हीट अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करून राबवला जात असेल तर विदेशाप्रमाणेच इतरही गोष्टीची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवा हवामान अभ्यासक अक्षय देवरस याने व्यक्त केली.