भाजपातील निष्ठावंत कार्यकर्ते नाराज

नागपूर : महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभा  निवडणूक संचालन समितीमध्ये स्थान देण्यात आल्यामुळे भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षातील  बुथ आणि पेज प्रमुखांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनी याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. आम्ही केवळ पत्रके वाटायची का, असा सवाल  त्यांनी नेत्यांना केला.

लोकसभा निवडणूक प्रचारासाठी जंबो संचालन समिती तयार करण्यात आली. त्यात सहाही विधानसभा मतदारसंघातील प्रमुख  कार्यकर्त्यांसोबतच २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीदरम्यान बंडखोरी करणाऱ्यांचीही वर्णी लावण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या पक्षातील ५४ पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर भाजपने कारवाई केली होती व त्यांना ६ वर्षांसाठी निलंबित केले होते. त्यात श्रीपाद रिसालदार आणि प्रसन्न पातूरकर  यांचाही समावेश होता. निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात आला. आता रिसालदार यांच्याकडे जाहीर सभा संचालनाची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण आणि दक्षिण पश्चिममधील अशाच प्रकारच्या १४ कार्यकर्त्यांना विधानसभानिहाय समितीमध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे मात्र अनेक वर्षांपासून पक्षात काम करणारे कार्यकर्ते नाराज झाले.

सोमवारी झालेल्या बुथ आणि पेज प्रमुखाच्या बैठकीत या संदर्भात अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्षाकडे तक्रार केली आहे.

‘‘महापालिका निवडणुकीच्यावेळी बंडखोरी करणाऱ्यांपैकी काही प्रमुख कार्यकर्त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. ते पक्षाचे कार्यकर्ते असल्याने त्यांना निवडणूक प्रचारात सहभागी करून घेतले आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी नाही. बुथ प्रमुख किंवा पेज प्रमुखांची नाराजी असेल तर त्यांची समजूत काढण्यात येईल. ’’

आ. सुधाकर कोहळे, शहर अध्यक्ष