24 January 2020

News Flash

कोण लढणार, भाजप की सेना?

जिल्ह्य़ातील प्रमुख विधानसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या काटोलमध्ये शिवसेना लढणार की भाजप, हा कळीचा मुद्दा आहे

(संग्रहित छायाचित्र)

काटोल विधानसभा मतदारसंघ

जिल्ह्य़ातील प्रमुख विधानसभा मतदारसंघापैकी एक असलेल्या काटोलमध्ये शिवसेना लढणार की भाजप, हा कळीचा मुद्दा आहे.  युतीत ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला आली असली तरी २०१४ च्या निवडणुकीत भाजपने ही जागा जिंकली. त्यामुळे या पक्षाचा या जागेवर दावा आहे.

राष्ट्रवादीचे नेते व या भागाचे माजी आमदार अनिल देशमुख यांनी २०१४ मध्ये पराभूत झाल्यावरही मतदारसंघात कायम संपर्क ठेवला. यावेळीही त्यांनी तयारी सुरू केली आहे. इतर दुसरे नाव सध्यातरी चर्चेत नाही. नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा पक्षाने विचार केल्यास देशमुख पुत्र सलील यांचे नाव चर्चेत येऊ शकते. सलील सुद्धा पाच वर्षांपासून या मतदारसंघाच्या संपर्कात आहेत. देशमुख पिता-पुत्रांच्या पक्ष सोडण्याच्या अफवा वारंवार पसरवल्या जात आहेत. मात्र, याचे त्यांचे कार्यकर्ते खंडन करतात. भाजपची ताकद मर्यादित आहे. मागील निवडणुकीतील पराभव हा देशमुख विरुद्ध देशमुख अशी लढत झाल्याने अत्यल्प मतांनी झाला. यावेळी आशीष देशमुख काँग्रेसमध्ये असल्याने व या दोन्ही पक्षाची आघाडी असल्याने याचा फायदा देशमुखांनाच होईल. दुसरीकडे जिल्ह्य़ाची सूत्रे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आहेत. पक्ष बदलल्यास देशमुख बावनकुळेंचे नेतृत्व मान्य करतील का, हा सुद्धा प्रश्न आहे. जायचे असेल तर ते शिवसेनेत जातील. दुसरीकडे सेना काटोलवर दावा करीत असली तरी या पक्षाला येथे कधीच विजय प्राप्त करता आला नाही, असा तर्क त्यांचे समर्थक मांडतात.

दुसरीकडे  २०१४ च्या निवडणुकीतील विजयाच्या आधारावर भाजपने या जागेवर दावा केला आहे. येथे पक्षाचे नेते चरणसिंग ठाकूर हे इच्छुक आहेत. मधल्या काळात नागपूरचे नगरसेवक अविनाश ठाकरे यांनी माळी समाजाच्या मतदारसंख्येच्या आधारावर मोर्चेबांधणी केली होती. मात्र त्यांना आता महामंडळावर घेण्यात आले आहे. राज्यमंत्री परिणय फुके यांचे गाव या तालुक्यात येत असल्याने त्यांच्या नावाचीही चर्चा केली जाते. मात्र, स्थानिकांनाच उमेदवारी द्यावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे. मात्र अनिल देशमुखांविरुद्ध सक्षम उमेदवारच टिकाव धरू शकणार असल्याने येथे भाजप उमेदवारी देताना सर्व बाबींचा विचार करण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नरखेड पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र हरणे यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघात सेना लढली तर भाजप त्यांना मदत करीत नसल्याचा आजवरचा इतिहास आहे. लोकसभा निवडणुकीत काटोलमध्ये सेनेला २२ हजार २०३ मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे युतीतील दोन्ही पक्षांच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे जागा नेमकी कोण लढवणार, यावरच पुढचे समीकरण ठरणार आहे. दरम्यान, ऐनवेळी देशमुख  यांनी इतर पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यास या जागेवर काँग्रेस दावा करू शकते, असे झाल्यास आशीष देशमुख यांच्या नावाचा विचार येथे होऊ शकतो.

First Published on August 14, 2019 2:12 am

Web Title: bjp shiv sena vidhan sabha mpg 94
Next Stories
1 ‘सिम्बॉयसिस’ला जे जमले, ते सरकारला का नाही?
2 नागपूर पोलीस मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुमची करणार तपासणी
3 नागपुरात नागरिकांनी मिळून केली गुंडाची हत्या
Just Now!
X