29 November 2020

News Flash

तिसऱ्या दिवशीही बससेवा ठप्प

नागरिकांचे बेहाल; महापालिकेतील सत्तापक्ष सुस्त

( संग्रहीत छायाचित्र )

नागरिकांचे बेहाल; महापालिकेतील सत्तापक्ष सुस्त

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृह शहरातील शहर बससेवा तीन दिवसांपासून ठप्प आहे. बससेवा संचालन करणाऱ्या तीनही कंपन्यांची देणी महापालिकेने थकवल्याने त्यांनी बसेस उभ्या करून ठेवल्या आहेत.  एकीकडे कंपन्या प्रवाशांना वेठीस धरत असून दुसरीकडे  प्रशासन आणि पदाधिकारी मात्र सुस्त आहेत.

महापालिकेची बससेवा चालवण्याची जबाबदारी आर.के. सिटी बस, हंसा ट्रॅव्हल्स ऑफ स्मार्ट सिटी आणि ट्रायव्हल टाईम या तीन कंपन्यांकडे आहे. या कंपन्यांना दर महिन्याला प्रत्येकी ५० ते ६० लाख रुपये द्यावे लागते. आर्थिक स्थिती डबघाईस आल्याने दर महिन्याला ही रक्कम देणे महापालिकेला शक्य नाही. तीनही कंपन्यांचे प्रत्येकी १५ कोटी रुपये महापालिकेला देणे आहे. वारंवार मागणी करूनही पैसे मिळत नसल्याने या  कंपन्यांनी शनिवारपासून बससेवा बंद केली आहे. रविवारी सुटी असल्यामुळे फारसा फरक पडला नाही मात्र, सोमवारी सकाळपासून प्रवाशांची गैरसोय होत आहे. शहरातील विविध भागात बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांना  आता खासगी वाहनांची मदत घ्यावी लागते. त्यांनीही भाडे वाढवले आहे. आज आगारामधून बसेस बाहेर पडल्या नाहीत. मोरभवनमध्ये आलेल्यांना वाढीव पैसे देऊन खासगी वाहनाने गंतव्य ठिकाणी जावे लागले. तीन कंपन्यांच्या मालकांशी महापालिकेचे अधिकारी चर्चा केल्यानंतर दुपारनंतर बसेस सुरू होतील अशी शक्यता होती. मात्र, कंपनी किमान प्रत्येकाला ३ कोटी मिळावे यावर ठाम आहे आणि महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता १ कोटीच्यावर देऊ शकत नाही. यामुळे जोपर्यंत पैसा मिळत नाही तोपर्यंत शहरात बस धावणार नाही, असा निर्णय कंपन्यांनी घेतला आहे. कंपनी आणि महापालिका प्रशासनाच्या या वादात मात्र नागरिकांचे हाल होत आहे आणि  पदाधिकारी व अधिकारी मात्र सुस्त आहेत.

प्रवासही महगला

शहर बस सेवा ठप्प झाली असतानाच दुसरीकडे तिकीट दरवाढीच्या प्रस्तावास महापालिकेने मंजुरी दिली आहे.पेट्रोल-डिझेल महागल्यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. बस दरवाढमध्ये २५ टक्के वाढ करण्यात आली आहे.

प्रत्येक महिन्यात येणारा कोटय़वधीचा तोटा कमी करण्याचे सर्व नियोजन फसल्यानंतर दरवाढीचा पर्याय स्वीकारल्या जात आहे. शहरात १ लाख ७७ हजार नागरिक शहर बसचा वापरकरतात. दररोज महापालिकेला १८ ते २० लाख उत्पन्न प्राप्त होते.  ग्रीन बस वगळता इतर बस प्रवासासाठी  प्रती २ किलोमिटरकरिता ८ रुपये भाडे आकारण्यात येते. तर,  ग्रीनबससाठी प्रती २ किलोमिटरसाठी १४ रुपये आकारण्यात येत होते. आता त्यात२ रुपयांनी वाढ केली.

प्रवाशांची गैरसोय

मोरभवनमधून मोठय़ा प्रमाणात प्रवासी कोराडी, हिंगणा आणि इतर ठिकाणी जातात. बससेवा बंद असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेकांना खासगी वाहनांचे पैसे देणे परवडत नसल्यामुळे आमच्यासमोर पर्याय काय, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला. आम आदमी आणि जय जवान जय किसान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोरभवन येथे शहर बस चालवणाऱ्या महापालिकेचा निषेध केला. शहर बससेवा बंद असल्याने ऑटो, सायकलरिक्षा चालकांनी भाडे वाढवले. एकीकडे पेट्रोल व डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू असताना शहर बससेवा बंद केल्याने नागरिकांना त्याचा चांगलाच फटका बसतो आहे.

कंपन्यांवर कारवाई करा -तळवेकर

आपली बसच्या चालक-वाहकांनी आपल्या मागण्यांसाठी शहर बससेवा बंद केली तर त्यांच्यावर मेस्मा लावण्यात येतो. आता तीन दिवसांपासून कंपन्यांनी बससेवा बंद केल्यामुळे तीनही ऑपरेटरवर कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी  भारतीय कामगार सेनेचे संघटक व माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी केली. यावेळी त्यांनी महापौरांना निवेदन दिले.

तीनही ऑपरेटर कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. १५ कोटी रुपये प्रत्येक ऑपरेटरचे देणे असले तरी त्यांना प्रत्येकी १ कोटी देण्याचे प्रशासनाने सांगितले. मात्र, त्यांनी ३ कोटीची मागणी केली आहे. चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यातून काही तोडगा निघेल.   – बंटी कुकडे, सभापती, परिवहन, महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2018 1:17 am

Web Title: bus service jam in nagpur
Next Stories
1 राज्यात एक लाख नागरिकांमागे नऊ जणांना फुफ्फुसाचा कर्करोग
2 ‘आयुष्यमान’ योजनेचा गोरगरिबांना फायदा -गडकरी
3 नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे कमी
Just Now!
X