भिवंडीतील टोरंट पॉवर कंपनीच्या मनमानी व गैरकारभारामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. हा करार रद्द करण्याच्या मागणीकरिता आज, गुरुवारी विधानसभेच्या पायरीवर आमदार रूपेश म्हात्रे यांनी उपोषण केले. सोबत शिवसेनेच्या आमदारांनी परिसरात जोरदार निदर्शने करून हा करार रद्द करण्याची मागणी लावून धरली. शासनाने टोरंट पॉवर कंपनीकडे भिवंडीचे काम देताच तेथील वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा वीज बिले येत आहेत. कंपनी लोकप्रतिनिधींना जुमानत नाही. कंपनीने वीज ग्राहकांकडे वेगाने फिरणारे मिटर बसवले असून, त्यामुळे ग्राहकांची लूट सुरू आहे असा आरोप केला.