काम प्रारंभ झाल्यावर दस्तुरखुद्द गडकरींचाच प्रस्ताव * आराखडाही बदलावा लागणार
नागपूर मेट्रो रेल्वेचा प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे एकीकडे आव्हान असताना दुसरीकडे मेट्रो रेल्वेच्या प्रस्तावित मार्गात बदल करण्याची सूचना खुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच केली असल्याने काही नवीन अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. ही मागणी मान्य झाल्यास अशाच प्रकारे अन्य स्थानके हलविण्याबाबत मागण्या आल्या तर काय करावे, असा प्रश्न ‘एनएमआरसीएल’पुढे भविष्यात निर्माण होण्याची शक्यता आहे.
नागपूर मेट्रो रेल्वे आणि जर्मन बँक केएफडब्ल्यू यांच्यात कर्ज पुरवठय़ासंदर्भात रविवारी नागपुरात करार झाला. या कार्यक्रमात गडकरी यांनी, मेट्रोच्या अजनी चौकाजवळील मार्गात बदल करून तो कारागृहाच्या जागेतून नेण्याचा प्रस्ताव एनएमआरसीएलपुढे ठेवला व कारागृहातील जागा मिळवून देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली व ती त्यांनी मान्य केली आहे. विशेष म्हणजे मेट्रो रेल्वेने प्रस्तावित मार्ग ठरविण्यापूर्वी शहराच्या प्रत्येक भागात जाऊन नागरिकांची मते जाणून घेतली होती, आक्षेप आणि सूचनाही मागविल्या होत्या. एकदा मार्ग निश्चित झाल्यावर त्यात दुरुस्ती करण्याची वेळ येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच मेट्रोने मार्गाच्या कामाला सुरुवात केली, सध्या या कामाने वेगही घेतला आहे. जर्मन बँकेने या प्रकल्पासाठी ३,७५० कोटी रुपयांचे कर्जही मंजूर केले आहे. आता या टप्प्यावर अजनी ते वर्धा मार्ग या दरम्यानचा मार्गात बदल करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे, त्याला सुरुवातीला काँग्रेसनगर चौक परिसरातील नागरिकांनी काही इस्पितळ आणि ज्यांच्या इमारती या मार्गात जात होत्या त्यांनीही विरोध केला होता मात्र तो प्रस्ताव अमान्य करण्यात आला होता.
मार्गाचा आराखडा निश्चित झाला तो आता बदलणार नाही हे कारण मेट्रो व्यवस्थापनाकडून देण्यात आले होते. मात्र आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच प्रस्तावात बदल सुचविला आहे. त्यामुळे व्यवस्थापनाची अडचण वाढली आहे. यासंदर्भात मेट्रो रेल्वे कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मेट्रोच्या विस्तारीत आराखडय़ाच्या वेळी याचा विचार केला जाईल, असे सांगितले. सध्याचा मार्ग अरुंद आहे, मात्र आराखडा तयार करण्यात आल्याने त्यात तत्काळ बदल करणे शक्य नाही, असेही त्यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.
महापालिकेच्या विकास आराखडय़ात अजनी रेल्वे स्थानकाच्या पुढच्या जागेतून रस्ता दर्शविण्यात आला आहे. याचाच आधार घेत महापलिकेने तेथे रस्ता करावा व त्यावरून मेट्रो रेल्वेचा मार्ग न्यावा असा आग्रह धरला आहे. यामुळे नागरकिांना मेट्रो रेल्वे आणि अजनी रेल्वे स्थानकावर जाण्याची सोय होईल, असा युक्तीवाद केला आहे. नागरिकांच्या सोयीचा हा प्रश्न असला तरी मेट्रोचे काम सुरु झाल्यावर हा बदल कसा करता येईल हा खरा प्रश्न आहे. असा बदल केल्यास अशाच प्रकारच्या मागण्या शहरातील इतर भागातून आल्यास काय करायचे? आदी प्रश्न आता व्यवस्थापनापुढे निर्माण होण्याची शक्यता आहे.