प्रफुल्ल पटेल यांचा पटोलेंना टोला

नागपूर : राज्यात निवडणुकीसाठी तीन वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे आजच शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीवर बोलणे हे काही योग्य नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असले तरी पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राहणार आहे. त्यामुळे मुख्यमत्र्यांची जागा पाच वर्षे रिकामी नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाव न घेता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना टोला लगावला.

पटेल शनिवारी सकाळी नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. काही दिवसापूर्वी  नाना पटोले यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. त्यावर बोलताना  पटेल म्हणाले, राज्यात तीन पक्ष मिळून महाविकास आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे ज्या पक्षाला जास्त बहुमत त्या पक्षाने कोणाला मुख्यमंत्री करावे हे ठरवावे. यावर मी बोलणे योग्य नाही. मात्र आजच्या स्थितीत बहुमत महाविकास आघाडीला आहे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहणार आहेत. त्यामुळे पाच वर्षे तरी ही जागा रिकामी नाही, असेही पटेल म्हणाले.  काँग्रेसचे प्रभारी एच.के. पाटील यांनी आघाडी करायची की नाही याबाबतचा निर्णय २०२३ नंतर होईल असे म्हटल्याचे मी सामाना वृत्तपत्रातच वाचले. त्यामुळे शिवसेना व राष्ट्वादी युतीबाबत ज्यांनी  विधान केले आहे त्यांनाच याबाबत विचारा, असेही पटेल म्हणाले.  सध्यातरी तीनही पक्षामध्ये समन्वय असून सगळे काही ठीक आहे आणि पाच वर्षे सरकार टिकणार असल्याचा दावा पटेल यांनी केला.

संघटना वाढविण्यासाठी एकत्र काम करा

आगामी महापालिका निवडणुका बघता कुठलेही हेवेदावे न ठेवता संघटना वाढविण्यासाठी एकत्र काम करा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र लढू की स्वबळावर  या निर्णयाची वाट न बघता  संघटन वाढवा, जनतेचे प्रश्न समजून घ्या,  असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पांडे ले आऊट सांस्कृतिक भवनात आयोजित  कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.  या कार्यक्रमाला माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, आभा पांडे, वेदप्रकाश आर्य, सलील देशमुख, प्रशांत पवार उपस्थित होते. शहरात क्वेटा कॉलनी, महाकाळकर सभागृह, गंजीपेठ व मस्कासाथ चौकात विविध कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते.   या मेळाव्यात रवीनिश पांडे (चिंटू महाराज) रमन ठवकर, मोहन गुरुपुंज, द्वारका साहू, योगेश नायकोर, गुलशन मुनियार, विजय गोखलानी, सचिन अग्रवाल, राजू पठान, अशफाक खान, इमरान खान, देवाशिष खराबे,  मो. नोबील अकील खान, अफसर खान, सोयल सयानी, जाकीर खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  प्रवेश केला.