महापालिकेसमोर कचरा व्यवस्थापनाचे आव्हान

स्वच्छ शहराच्या यादीत टिकून राहण्यासाठी मागील वर्षीपासून महापालिका केविलवाणी धडपड करीत आहे. यावर्षी देखील सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, गेल्या आठवडाभरातील कचरा व्यवस्थापनाच्या ढिसाळ नियोजनामुळे स्वच्छ सर्वेक्षणाबाबत महापालिकेसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणारे हे शहर स्वच्छतेअभावी मागे पडत आहे. स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षी हे शहर माघारले. आता कचरा व्यवस्थापनाच्या नव्या कंत्राटाने पालिकेसमोर अडचणी निर्माण केल्या आहेत. कचरा उचलण्याच्या कामाचे खासगीकरण  केल्यानंतरही शहराची परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत आहे. २०१२ मध्ये पालिकेने कनक कंपनीला कचरा उचलण्याचे काम दिले, पण त्यांच्याकडून अपेक्षित परिणाम मिळाला नाही. तरीही या कंपनीला मुदतवाढ देण्यात आली. आता दोन नव्या कंपन्यांना कचरा व्यवस्थापनाचे कंत्राट दिले आहे. १६ नोव्हेंबरला या दोन्ही कंपन्यांनी कचरा व्यवस्थापनाची धुरा हाती घेतली. मात्र, आठवडा उलटूनही त्यात यश आले नाही. उलट परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. अध्र्याहून अधिक नागरिकांच्या घरापर्यंत ते पोहोचलेले नाहीत. त्यामुळे  नागरिकांनी घरातील कचरा रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली. आता तर हा कचरा जाळण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्यावर कचरा जाळणे हा गुन्हा आहे, पण नागरिकांपुढे कोणताही पर्याय उरलेला नाही. प्रतापनगरातील नवनिर्माण सोसायटी, फ्रेंड्स सोसायटी, विद्याविहारसह अजनी रेल्वे कॉलनी, सहकारनगर आदी परिसरात सर्रासपणे कचरा जाळला जात आहे. शहरातील रस्ते स्वच्छ करणारे पालिकेचे कर्मचारीदेखील यात सहभागी आहेत. कचरा जाळण्याचे प्रमाण शहरात कमीकमी होत चालले होते, पण नव्या व्यवस्थापनातील गोंधळामुळे हा प्रकार पुन्हा सुरू झाला आहे. आठवडाभरात कचरा व्यवस्थापनाची घडी नीट बसेल, असा विश्वास नव्या कंपन्यांसह पालिका प्रशासनाने व्यक्त केला होता. मात्र, त्यात तसूभरही फरक पडलेला नाही.

सुरुवातीलाच दंड

आठवडा उलटूनही कचरा व्यवस्थापन यंत्रणेत काहीच बदल न झाल्याने पालिका प्रशासनाने एजी आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांना एक-एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. २०१२ साली कनकला पालिकेने कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली तेव्हाही तब्बल सहा महिने ही घडी नीट बसली नव्हती.

कचरा उचलण्याच्या कामाचे खासगीकरण केल्यानंतरही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. आम्ही आधीच या खासगीकरणाला विरोध केला होता. कारण नागरिकांच्या आरोग्याशी  जुळलेली प्रत्येक गोष्ट खासगीकरणाने सुधारण्याऐवजी बिघडतच जाते, असा आजवरचा अनुभव आहे. यापूर्वी पालिकेचा आरोग्य विभागच शहराची स्वच्छता सांभाळत होता. – वेदप्रकाश आर्य, माजी नगरसेवक.