गोदामासारखा वापर, परिसराचा वापर घोडे बांधण्यासाठी

जुनी मंगळवारी परिसरातील महापालिकेच्या बंद शाळेचा मत्स्य व्यावसायिकांनी अवैधपणे ताबा घेतला आहे. व्यावसायिकांची या भागात कमालीची दहशत असून याविरोधात कोणी बोलायलाही तयार नाहीत. महापालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग किती बेफिकीर आहे, याचे हे उत्तम उदाहरण ठरावे.

विद्यार्थी मिळत नसल्याने महापालिकेच्या अनेक शाळा बंद पडल्याने इमारती ओस पडल्या आहेत. अशा इमारतींमध्ये असामाजिक तत्त्वांचा वावर असून काही ठिकाणी त्यांनी पूर्ण इमारतीवरच ताबा मिळवला आहे. जुनी मंगळवारी भागातील ढिवरपुरा भागातील महापालिकेची कन्या शाळा ही त्यापैकीच एक आहे. पूर्वी या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग होत होते.

कालातंराने पटसंख्या कमी झाल्याने तेथे उर्दू शाळा सुरू करण्यात आली. या शाळेत एकूण ५० विद्यार्थी होते. मात्र, कालांतराने ऊर्दू शाळाही बंद पडली. वर्षभर बेवारस असलेल्या शाळेच्या इमारतीवर त्या भागातील मत्स्य व्यवसायिक सुरेश शिवरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवैध ताबा घेतला. शिवाय इमारतीच्या बाजूने मंडप डेकोरेशनचे दुकान आहे. त्यांनी शाळेचा वापर डेकोरेशनचे सामान ठेवण्यासाठी सुरू केला. महापालिकेने याकडे सपशेल दुर्लक्ष केले.

सध्या इमारतीमध्ये पोते, लाकडी सामान, कोंबडय़ा, मासे भरून पोते ठेवण्यात आले आहे. परिसराचा वापर दोन घोडे बांधण्यासाठी केला जात आहे. आत मासोळी बाजाराचे साहित्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे परिसरात दरुगधी पसरली आहे. शाळेचे बाहेरचे प्रवेशद्वार बंद असले तरी त्यांचा ताबा मत्स व्यावसायिकांकडेच आहे. त्यांच्या परवानगीशिवाय त्या परिसरात कुणी प्रवेश करू शकत नाही.

दरम्यान, रात्रीच्यावेळी इमारतीत असामजिक तत्त्वांचा वावर वाढू लागला आहे. परिसरात अस्वच्छता पसरली. त्याचा लोकांना त्रास होऊ लागला. या भागातील (प्रभाग क्रमांक २२) चारही नगरसेवक भाजपचे आहेत, त्यांच्याकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र, काहीही कारवाई झाली नाही. नगरसेवकांवर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

लालगंज, जागनाथ बुधवारीत असाच प्रकार

यापूर्वीही महापालिकेच्या शाळेचा वापर शिक्षणेत्तर कामासांठी होत असल्याचे इतरही भागात उघड झाले आहे. लालगंज भागातील एका बिछायत केंद्र थाटण्यात आले आहे. जागनाथ बुधवारी भागातील शाळेचा वापर चक्क जनावरे ठेवण्यासाठी केला जातो. याबाबत ओरड झाल्यावर महापालिका शाळा इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, त्यात जुनी मंगळवारीतील शाळा अधिकाऱ्यांच्या नजरेस आली नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

..तर सामान बाहेर काढू

जुन्या मंगळवारी परिसरातील शाळा इमारतींवर मस्त्य व्यावसायिकांनी ताबा घेतला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल आणि सामान बाहेर काढण्यात येईल. संबंधित झोनच्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा करण्यात येणार आहे आणि त्यात ते दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

दिलीप दिवे, सभापती, शिक्षण सभापती

((   जुनी मंगळवारीतील याच शाळेवर मत्स्य व्यवसायिकांनी ताबा घेतला आहे.       )))