संविधान दिनाचा अभूतपूर्व सोहळा साजरा
आम्ही भारताचे लोक. भारताचे एक सार्वभौम.. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त भारतीय राज्य घटनेच्या उद्देशिकेचे शहरातील विविध शाळांतील एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी एकसुरात वाचन करून संविधान दिन साजरा केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. ‘भारत माता की जय’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे’ अशा घोषणांनी यशवंत स्टेडियम परिसर दुमदुमून गेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही या समूह वाचनात सहभागी झाले होते.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने यशवंत स्टेडियमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संविधान दिनाच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रवीण दटके, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आदी मान्यवर उपस्थित होते. यशवंत स्टेडियमकडे येणाऱ्या सर्व मार्गावरून सकाळी विविध शाळांचे विद्यार्थी दिसून येत असताना त्यांना आतमध्ये बसविले जात होते. भारताचा नकाशा असलेल्या तिरंगाच्या आकारात विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती त्यामुळे स्टेडियममध्ये तिरंगाचे विहंगम दृष्य दिसून येत होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचे वाचन करीत असताना उपस्थित समुदाय आणि विद्यार्थ्यांनी वाचन केले. संविधानाचे वाचन केल्यानंतर भारत माता की जय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे अशा घोषणा देत परिसर दुमदुमन गेला.
यावेळी प्रास्ताविकात सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राज्य आणि केंद्र सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहे. इंदू मिल स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले, लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानाचा निर्णय झाल्यानंतर आजचा संविधान दिनाचा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा सोहळा आज साजरा होत आहे. संविधानाने देशाला प्रेरणा दिली असून त्याच आधारावर देश प्रगती करीत आहे. संविधानातील विचार हा प्रत्येक विद्यार्थ्यांंपर्यंत पोहोचवून सशक्त लोकशाही निर्माण करण्याचे काम केले जात आहे. माधुरी यावलकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.

संविधानानुसार देशाचे मार्गक्रमण – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले असून त्यांच्या संविधानानुसार देश मार्गक्रमण करीत आहे. या संविधानामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार देण्यात आला आहे. संविधानाच्या मार्गावर देशात काम सुरू असताना प्रगत देश म्हणून देशाची वाटचाल सुरू आहे. या संविधानाचा उपयोग हा जगाला मार्गदर्शन करणारा असून येणाऱ्या काळात त्यातून सकारात्मक परिवर्तन होईल. संविधान अनुरुप असे कार्य करून उत्तम राज्य बनवू असा आशावाद फडणवीस यांनी व्यक्त केला.
सेल्फीची हौस
आजच्या संविधान दिन सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे कलावंत सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे, निशा परुळेकर आणि प्राजक्ता माळी यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कलावंतांना विद्यार्थ्यांंशी संवाद साधण्यासाठी फार वेळ देण्यात आला नाही. केवळ शुभेच्छा देण्यासाठी ते समोर आले. कार्यक्रम संपल्यानंतर अनेक शिक्षकांनी आणि काही व्यवस्थेत हौशी कार्यकर्त्यांनी सेल्फीची हौस भागवून घेतली.
उन्हामुळे विद्यार्थ्यांना भोवळ
संविधान वाचन कार्यक्रमात १ लाख २५ हजार विद्यार्थी सहभागी होतील असे जाहीर करण्यात आल्यामुळे शहरातील महापालिका, जिल्हा परिषद आणि खासगी शाळेतील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात यशवंत स्टेडियममध्ये सकाळी ७.३० वाजेपासून येऊ लागले होते. त्यासाठी शहरातील विविध भागातील खासगी आणि शासकीय बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ लागला होता. आयोजकांनी पिण्याची पाण्याची व्यवस्था केली होती. मात्र, सर्व विद्याथ्यार्ंपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. शहरातील अंध, अपंग, मूकबधिर शाळेतील विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले असताना त्यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. उन्हामुळे अनेक विद्यार्थ्यांना भोवळ आल्याने काही वेळ धावपळ उडाली. सर्व शासकीय यंत्रणा या कार्यक्रमासाठी कामाला लागली असताना कार्यक्रम संपल्यानंतर मात्र स्टेडियम परिसरात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचे पाऊच आणि कचरा पडला होता आणि विद्यार्थ्यांंकडून तो उलचलण्यात आल्याचे चित्र यावेळी दिसून आले.