एका गटाक डून टीका, दुसऱ्याकडून कौतुक; शिवसेनेची मात्र सावध भूमिका

नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना पाठिंबा देण्यावरून काँग्रेस नगरसेवकांमध्ये दोन गट पडल्याचे सर्वसाधारण सभेच्या दोन दिवसांच्या चर्चेतून दिसून आले. पहिल्या दिवशीच्या  चर्चेत काँग्रेस नगरसेवकांनी मुंढेच्या कार्यशैलीवर जोरदार टीका केली. मात्र आज बुधवारी दुसऱ्या दिवशी काँग्रेसचेच बंटी शेळके आणि कमलेश चौधरी या दोन सदस्यांनी मुंढेच्या कामाचे मुक्तकंठाने कौतुक करीत त्यांच्याच प्रयत्नामुळे शहरात करोना नियंत्रणात असल्याचा दावा केला. शिवसेनेने मात्र सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादीने महापौरांना धारेवर धरले. आजही चर्चा  अपूर्णच राहिली असून उद्या आयुक्त काय बोलतात, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी अपूर्ण राहिलेल्या स्थगन प्रस्तावावर बुधवारी पुन्हा चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे बंटी शेळके आणि कमलेश चौधरी यांनी  मुंढेच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्यावर लावण्यात येत असलेले आरोप हे केवळ राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला. यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. मात्र काँग्रेसचेच सदस्य रमेश पुणेकर, संजय महाकाळकर, हरीश ग्वालबंशी, संदीप सहारे, नितीन ग्वालबंशी, मनोज सांगोळे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. रमेश पुणेकर यांनी करोनाच्या निमित्ताने बांगलादेश आणि नाईक तलाव वस्त्यांना बदनाम करण्यात आल्याचा आरोप करीत आयुक्तांवर कारवाईची मागणी केली. नगरसेवक नितीन साठवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याबाबत चुकीची माहिती देण्याऱ्या सतरंजीपुरा झोनच्या सहायक आयुक्तावर कारवाई करण्याची मागणी सहारे यांनी केली. महाकाळकर यांनी आयुक्त भेटत नाही अशी तक्रार केली.

भाजपचे बाल्या बोरकर, बंटी कुकडे, दिलीप दिवे, दिव्या धुरडे, वीरेंद्र कुकरेजा, धर्मपाल मेश्राम, पिंटू झलके, संजय बंगाले तर बसपाचे मो. जमाल. इब्राहीम टेलर, वंदना चांदेकर यांनी आयुक्तांच्या एककल्ली कामकाजावर  टीका केली. प्रभागातील विकासकामे आयुक्तांमुळे थांबल्याचा आरोपही त्यांनी केला. समाजमाध्यमांवर नगरसेवकांची प्रतिमा मलीन करण्यावरही अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. स्थगन प्रस्ताव मागे घेणाऱ्या शिवसेनेच्या मंगला गवरे या आजही सभागृहाकडे फिरकल्या नाहीत.

 

साठवणेंवर पक्षाचा दबाव

शिवसेनेच्या सदस्य मंगला गवरे यांनी मंगळवारी स्थगन प्रस्ताव मागे घेण्याचे पत्र दिल्यानंतर काँग्रेसचे नितीन साठवणे यांच्यावरही त्यांनी दिलेला स्थगन प्रस्ताव मागे घ्यावा म्हणून पक्षाकडून दबाव वाढलाआहे. पक्षाचे गट नेते व  विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी त्यांना याबाबत पत्र दिले होते. प्रस्ताव मागे घेतला नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला होता. यानंतरही साठवणे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आयुक्तांवर टीका केली. त्यामुळे आता त्यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाणार का, याकडे  लक्ष लागले आहे. याबाबत नितीन साठवणे म्हणाले, माझी काही चूक नसताना माझ्यावर आयुक्तांच्या सांगण्यानुसार गुन्हा दाखल केला जात असेल तर या अन्यायाविरोधात बोलायचे नाही का,  प्रदेश काँग्रेससमोर मी भूमिका स्पष्ट करणार आहे.

करोना, विकासाचा मुद्दा मागे पडला

महापालिकेची सर्वसाधारण सभा ही विविध विकास कामांच्या चर्चेसाठी किंवा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आयोजित केली असताना गेल्या तीन दिवसांपासून  स्थगन प्रस्तावावर चर्चा करून आयुक्तांना लक्ष्य केले जात आहे. पावसाळ्याचे दिवस आणि करोना रुग्णांची वाढती संख्या बघता त्यावर उपाययोजना करण्यासाठी किंवा विकास कामांच्या बाबतीत कोणीच बोलत नाही. या सभेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांना सभागृहाबाहेर पडणे कठीण झाले आहे.