काँग्रेस प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर यांचा आरोप

नागपूर : पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार  यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आमदार टेकचंद सावरकर यांनी हेतुपुरस्कर गोंधळ घालून कार्यकर्त्यांकरवी  चित्रफित तयार केली. त्यामुळे शासकीय बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न व  शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कंभाले, माजी जि.प. सदस्य अवंतिका लेकुरवाळे उपस्थित होत्या.

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी व  सरपंचांच्या अडचणी समजून घेण्यासाठी सोमवारी ही आढावा बैठक  होती.  आमदार सावरकर उशिरा आले. मंत्री सुनील केदार हे  सरपंचांच्या तक्रारी ऐकत असताना सावरकर यांनी माईक घेऊन सभेत व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मंत्र्यांनी बोलण्याची संधी दिली जाईल, असे सांगूनही त्यांनी  माईक हिसकावला.  आपल्या कार्यकर्त्यांना चित्रिकरण करण्यास सांगितले. सुनियोजित पद्धतीने बैठकीत गोंधळ घातला. बसण्यासाठी जागा मिळाला नाही म्हणून शिष्टाचार सांगणाऱ्या आमदारांनी मंत्र्यांच्या आगमनापूर्वी बैठकस्थळी पोहचण्याचा शिष्टाचार का पाळला नाही, असा सवालही भोयर यांनी केला.

‘अपघाती’ आमदार! 

गेल्या दीड वर्षांत त्यांनी मतदारसंघात काहीच केले नाही. एकही आढावा बैठक घेतली नाही. आपल्या याच नाकर्तेपणावर पडदा घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.  त्यांचे करोना काळात बेपत्ता असे पोस्टर लागले होते त्यामुळे ते आता आपण सक्रिय असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत आहेत. अपघाती आमदारांनी मंत्र्यांवर किंवा काँग्रेसवर आरोप लावण्यापूर्वी आपली पत तपासावी, सन्मान मागून मिळत नाही, कर्तृत्वाने मिळते, असा टोलाही भोयर यांनी लगावला.