महेश बोकडे

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ प्रवेशपूर्व (पीईटी- २०२९-२०) परीक्षेचा विद्यापीठाने सुधारित निकाल जाहीर केला. त्यात काही विद्यार्थ्यांना मिळालेल्या मोठय़ा गुणवाढीमुळे काहींनी आक्षेप घेत विशिष्ट विद्यार्थ्यांसाठी घोटाळा केल्याचा आरोप केला आहे.

आरोग्य विद्यापीठाची ‘पीएचडी’ करणाऱ्यांत बहुतांश वैद्यकीय शिक्षकांचाच समावेश असतो. यापूर्वी विद्यापीठाची ‘पीएचडी’ प्रवेशपूर्व परीक्षा २०१६ मध्ये झाली होती. त्यात ५०० विद्यार्थी बसले होते. त्यानंतर सलग चार वर्षे ही परीक्षा झाली नाही. १ मार्च २०२० रोजी २०१९- २० या सत्राकरिता पुन्हा ‘पीएचडी’ची प्रवेशपूर्व परीक्षा झाली. त्यात सुमारे २ हजार विद्यार्थी सहभागी झाले. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असता त्यात काहींना कमी गुण मिळाले होते. या परीक्षेत पेपरची पुनर्तपासणी व पुन र्गुण तपासणीचा पर्याय नसतो. त्यानंतरही विद्यापीठाने दुसऱ्यांदा सुधारित निकाल जाहीर केला. या निकालात आश्चर्यकारकरित्या आयुर्वेदसह इतर काही शाखेतील विद्यार्थ्यांचे गुण मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे समोर आले.

२०० गुणांची परीक्षा

पीएचडी’ प्रवेशपूर्व परीक्षा ही एकूण २०० गुणांची होती. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्नपत्रिकेत चार पर्याय होते. त्यातील योग्य पर्याय विद्यार्थ्यांला निवडायचा होता. या परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांला ५० टक्के तर राखीव जातींच्या विद्यार्थ्यांना ४५ टक्के गुण आवश्यक असतात.

‘पीएचडी’ची परीक्षा दिलेल्या विशिष्ट मोठय़ा व्यक्तींसाठी विद्यापीठाने हा मोठा घोटाळा केला आहे. या प्रकरणात आरोग्य विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. तातडीने चौकशी करून प्रामाणिक परीक्षार्थीना न्याय देण्याची गरज आहे.

– डॉ. आशय नंदेश्वर, परीक्षार्थी, वसंतदादा पाटील मेडिकल कॉलेज.

परीक्षेचा पहिला निकाल जाहीर झाल्यावर काही विद्यार्थ्यांनी आम्ही स्वत: शिक्षक असून आम्हाला इतके कमी गुण मिळणे शक्य नसल्याची तक्रार केली. त्यांनी विशिष्ट वर्गात परीक्षा दिलेल्यांनाच कमी गुण मिळाल्याचे निदर्शनात आणून दिले. त्यावर विद्यापीठाची विशेष परीक्षा समिती, कुलगुरू व प्रकुलगुरूंना हा प्रकार सांगितल्यावर नियमानुसार निकाल प्रक्रियेची सूक्ष्म चौकशी करण्यात आली. त्यात निकाल तयार केलेल्या संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये चुकीची बटण दबल्याने निकालात चूक झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पारदर्शी पद्धतीने पुन्हा सर्वच शाखेचे सुधारित निकाल जाहीर केले. यात कुठलाही घोटाळा नाही.

– डॉ. अजित पाठक, परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक