शहरात २१ ठिकाणी समुपदेशन व तपासणी सेवा

नागपूर : कुठलीही लक्षणे आढळल्यास किंवा करोना चाचणी करवून घेणे आणि भीती असेल तर समुपदेशन करवून घेण्यासाठी महापालिकेने शहरातील विविध भागात २१ केंद्रांवर चाचणी सुरू केली आहे. यामुळे नागरिकांना आता घराजवळच चाचणी, समुपदेशन व अन्य सेवा मिळाल्या आहेत.

शहरातील सहा ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत चाचणी करता येईल. यामध्ये आशीनगर झोनअंतर्गत असलेला प्रभाग क्रमांक ७ मधील पाचपावली पोलीस वसाहत, धरमपेठ  झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक १४ मध्ये लॉ कॉलेज होस्टेल आणि रविभवन, धरमपेठ झोनमधील प्रभाग क्रमांक १५ मध्ये मॉरिस कॉलेज होस्टेल, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक १० मधील राजनगर आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ३७ मधील आर.पी.टी.एस. या ठिकाणी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त नागपूर महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही सेवा मिळेल. यामध्ये धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील फुटाळा आणि तेलंगखेडी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ९ मधील इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ८ मधील मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ३८ मधील जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक २० मधील जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मधील झिंगाबाई टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक  १९ मधील भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक २१ मधील शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनअंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २६ मधील नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक २५ मधील पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक ३३ मधील बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक २४ मध्ये डिप्टी सिग्नल प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनअंतर्गत प्रभाग क्र. ३० मधील बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग क्रमांक १३ मधील हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र या केंद्रांचा समावेश आहे.

यासंदर्भात महापालिकेच्या वतीने प्रत्येक प्रभागात एक असे एकूण ३८ करोना चाचणी केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न असून प्रत्येक नागरिकाला घराजवळ चाचणी करता यावी, हा त्यामागील उद्देश असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

निदान आणि उपचार

करोना चाचणी केंद्रांवर करोना, सारीसोबतच अन्य रक्त तपासणी करून निदान करण्यात येईल. त्यातून पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला आमदार निवास कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. तेथे अन्य तपासण्या केल्यानंतर रुग्णाच्या लक्षणावरून कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यायचे की गृह विलगीकरणात ठेवायचे, त्यादृष्टीने नागपूर महापालिकेचे पथक मार्गदर्शन करेल.