‘करोना’ आजाराच्या भीतीचा फटका

नागपूर : एरव्ही चिकनवर ताव मारणाऱ्या नागपूरकरांनी  करोना आजाराचा चांगलाच धसका घेतला आहे. परिणामी चिकन बाजारातील ग्राहक संख्या रोडावली आहे. विशेष म्हणजे, सावजी हॉटेलांमध्येही चिकन खाणाऱ्यांची संख्या घटली असून करोना विषाणूमुळे व्यवसायावर परिणाम झाल्याचे विक्रेते सांगत आहेत.

हा आजार मांस खाल्ल्याने होत असल्याचे संदेश समाज माध्यमांवर फिरत आहेत. ते संदेश वाचून अनेकांनी चिकन खाणे तात्पुरते थांबवले आहे.  सर्दी, खोकला, ताप व शिंका असे करोना विषाणूची लक्षणे आहेत.  मात्र शहरात सध्या ढगाळ आणि पावसाचे वातावरण असल्याने अनेकांचे घसे खवखवत असून वातावरण बदलामुळे

अनेकांना सर्दी, तापाची लागण होत आहे. चिकन खाल्ल्याने तर आपण आजारी पडलो नाही, असा काहींचा समज होत आहे.  रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी अनेक नागपूरकर चिकनवर ताव मारतात. मात्र गेल्या आठडय़ापासून चिकन बाजारात गर्दी ओसरलेली दिसून येत आहे. हैदराबाद येथून बायलर आणि हैदराबाद गावरानी कोंबडय़ांची आवक  नागपुरात होते. दररोज नागपुरात ३० ते ४० ट्रक कोंबडय़ा येतात. त्याशिवाय स्थानिक जिल्’ांमधूनही माल बाजारात येत आहे. मात्र सध्यास्थितीत कोंबडय़ांची आवक तेवढीच असून उचल मात्र  कमी झाली आहे. याशिवाय सावजी भोजनालयमध्येही चिकनच्या खवय्यांची संख्या घटली असून त्याऐवजी मटणची मागणी होत आहे. मासोळी बाजाराकडेही ग्राहकांनी पाठ फिरवलेली दिसत आहे.

गेल्या दोन आठवडय़ांपासून काही प्रमाणात व्यवसायात घट झाली आहे. घरगुती ग्राहकांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी झाली आहे.

– शेख रिझवान, चिकन विक्रेता, उंटखाना.

चिकन, मटणचा करोना विषाणूशी संबंध नाही

समाज माध्यमांवर करोना संदर्भात चुकीची माहिती प्रसारित होत आहे. चिकन किंवा मटणचा करोना विषाणूशी काहीही संबंध नाही. त्यामुळे नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही.

– डॉ. अतुल राजकोंडावार, औषधशास्त्र विभाग, मेडिकल.