नागपूर, औरंगाबाद : राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर, नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.
अमरावतीत तिरंगी लढत
अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पािठब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, बच्चू कडू महायुतीत असूनही त्यांनी राणांविरुद्ध उमेदवार दिला असून राणांचा पराभव हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा >>>वर्धा : हिरकणी कक्ष घेत आहेत लक्ष वेधून!
बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिवसेना
बुलढाणा : वरकरणी युतीविरुद्ध आघाडी अशी वाटणारी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील लढत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या उमेदवारीमुळे तिरंगी झाली आहे. त्यामुळे महायुती विरोधातील मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान खासदार प्रतापराव जाधव, शिवसेना ठाकरे गटातर्फे नरेंद्र खेडेकर तर शेतकरी नेते रविकांत तुपकर अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. जाधव व खेडेकर हे एकसंध शिवसेनेतील कट्टर सैनिक. त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच लढत होत असून त्याला ‘गद्दार’ विरुद्ध ‘खुद्दार’ अशी किनार आहे. या लढतीत रविकांत तुपकर किती मते घेतात यावरच जय-पराजयाचे गणित ठरणार आहे.
वर्ध्यात थेट लढत
वर्धा : वर्ध्यात भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. भाजपतर्फे रामदास तडस तर महाविकास आघाडीतर्फे अमर काळे रिंगणात आहेत. तडस यांच्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला. अमर काळे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी प्रचारसभा घेतल्या. तेली विरुद्ध कुणबी अशी जातीय किनार या लढतीला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी ही जागा प्रतिष्ठेची आहे. काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ पवार यांनी यावेळी राष्ट्रवादीकडे घेतला आहे.
हेही वाचा >>>अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेऊन…
यवतमाळमध्ये चुरस
यवतमाळ : निर्मितीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात यावेळी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेचे (ठाकरे गट) संजय देशमुख तर महायुतीतर्फे शिवसेनेच्या (शिंदे गट) जयश्री हेमंत पाटील रिंगणात असल्याने येथेही ‘शिवसेना विरुद्ध शिवसेना’ अशीच लढत होत आहे. त्याला कुणबी विरुद्ध देशमुख अशी जातीय किनार असली तरी बहुसंख्येने असलेला बंजारा समाजाचा कौलही महत्त्वाचा ठरणार आहे. उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या गटाची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरणार आहे. सेनेच्या दोन्ही गटाने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. महायुतीच्या बडय़ा नेत्यांच्या येथे प्रचारसभा झाल्या. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे.
अकोल्यात तिरंगी लढत
अकोला : जातीय राजकारण व मतविभाजनावर विजयाचे समीकरण ठरवणाऱ्या अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपचे अनुप धोत्रे, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत आहे. विद्यमान खासदास संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे हे प्रथमच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. अॅड. प्रकाश आंबेडकर सलग अकराव्यांदा अकोल्यातून आपले नशीब आजमावत आहेत.
हिंगोलीत चुरशीची लढत
हिंगोलीत शिवसेना एकनाथ शिंदे गटाने प्रथम विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र महायुतीमध्ये नाटय़मय घडामोडींनंतर शिवसेनेच्याच बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीसाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाने नागेश आष्टीकर यांना मैदानात उतरवले आहे. वंचित बहुजन आघाडीने डॉ. बी. डी. चव्हाण रिंगणात आहेत. शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाने ही जागा प्रतिष्टेची केली आहे.
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांची कसोटी
नांदेड : नांदेड मतदारसंघात भाजपचे खासदार प्रतापराव चिखलीकर आणि काँग्रेसचे वसंत चव्हाण यांच्यात लढत होणार आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नांदेडमधील राजकीय समीकरणे बदलली. अशोक चव्हाण यांच्या पक्षांतरानंतरही काँग्रेस संघटना बळकट असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळेच नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांची खरी कसोटी आहे.
परभणीचा गड कायम राखण्याचे ठाकरे यांच्यापुढे आव्हान
परभणी : परभणीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव आणि महायुतीच्या वतीने रिंगणात असलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांच्यात लढत होत आहे. परभणी आणि शिवसेना हे समीकरण गेली अनेक वर्षे कायम आहे. शिवसेनेतील फुटीनंतरही परभणीत त्याचे पडसाद उमटले नव्हते. थेट लढतीत परभणीचा गड कायम राखण्याचे ठाकरे गटापुढे आव्हान आहे.