२४ तासांत १३ मृत्यू; ४२७ नवीन बाधित

नागपूर : जिल्ह्य़ात मागील २४ तासांत ६ हजार ७७५  चाचण्या करण्यात आल्या. त्यातील केवळ ६.३० टक्के व्यक्तींनाच करोना असल्याचे निदान झाले. याशिवाय २४ तासांत जिल्ह्य़ात १३ मृत्यू तर ४२७ नवीन बाधितांची भर पडली.

शहरात मंगळवारी  ५ हजार ६५९ तर ग्रामीण १ हजार ११६ अशा एकूण ६ हजार ७७५ चाचण्या झाल्या. चाचण्यांची संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेत वाढली तरीही  एकूण चाचण्यांतील केवळ ६.३० टक्केच अहवाल सकारात्मक आले. नवीन बाधितांमध्ये शहरातील ३३६, ग्रामीणचे ८८, जिल्ह्य़ाबाहेरील ३ अशा एकूण ४२७ जणांचा समावेश आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या बाधितांची संख्या ७१ हजार ३५३, ग्रामीण १९ हजार ६५९, जिल्ह्य़ाबाहेरील ५४७ अशी एकूण ९१ हजार ५५९ वर पोहोचली आहे.  दिवसभरात शहरात ७, ग्रामीणला ३, जिल्ह्य़ाबाहेर ३ असे एकूण १३ मृत्यू नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूंची संख्या २ हजार ८४, ग्रामीणची ५३०, जिल्ह्य़ाबाहेरील ३६५ अशी एकूण २ हजार ९७९ वर पोहोचली आहे.

शहरात सिरो सर्वेक्षण दोन दिवस लांबणीवर!

नागपूरच्या ग्रामीण भागात सिरो सर्वेक्षणासाठी नागरिकांचे नमुने घेण्याचे काम सुरू झाले असले तरी शहरात किट्ससह इतर काही तांत्रिक अडचणीमुळे अद्याप काम सुरू झाले नाही. त्यामुळे शहरातील हे काम आणखी दोन दिवस लांबणीवर गेले आहे. यापूर्वी जिल्ह्य़ातील पहिला सिरो सर्वेक्षणाचा प्रकल्प तांत्रिक कारणाने बंद झाला असताना दुसऱ्या प्रकल्पाचे कामही लांबत असल्याने वैद्यकीय क्षेत्राचे जाणकार आश्चर्य व्यक्त करत आहेत.

करोना लसीसाठी स्क्रिनिंग झालेल्यांची संख्या वीसवर

मेडिकल  केंद्रात ऑक्सफोर्ड विद्यापीठात विकसित कोविशिल्ड ही लस घेण्यास इच्छुक स्वयंसेवकांची संख्या मंगळवारी वीसवर पोहोचली आहे. या सगळ्यांचे करोना आणि प्रतिपिंड तपासणीसाठीचे नमुने घेण्यात आले आहे. त्याचा अहवाल बुधवारी आल्यावर पुढील कारवाई होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ९० टक्क्यांच्या वर

दिवसभरात शहरात ४००, ग्रामीणमध्ये १८३ असे एकूण ५८३ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे आजपर्यंतच्या शहरातील करोनामुक्तांची संख्या ६५ हजार २००, ग्रामीणला १७ हजार २३९ अशी एकूण ८२ हजार ४३९ वर पोहोचली आहे. आजपर्यंतच्या बाधितांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण ९०.०४ टक्के आहे.

६२ टक्के सक्रिय रुग्ण शहरातील

जिल्ह्य़ात नवीन करोना बाधितांच्या तुलनेत करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या मंगळवारीही कायम असल्याने एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १४१ वर पोहोचली आहे. त्यातील ६२ टक्के म्हणजे ३ हजार ७९६ रुग्ण शहर, २ हजार ३४५ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत.

विदर्भातील मृत्यू

(२० ऑक्टोबर)

जिल्हा                  मृत्यू

नागपूर                  १३

वर्धा                     ०१

चंद्रपूर                  ०३

गडचिरोली            ०२

यवतमाळ              ०२

अमरावती             ०१

अकोला                ००

बुलढाणा              ००

वाशीम                 ००

गोंदिया                 ०१

भंडारा                  ०१ एकूण