मेडिकलमध्ये वैद्यकीय व दंतच्या डॉक्टरांमध्ये भेदभाव

नागपूर :  मेडिकलच्या  कर्मचाऱ्यांना करोना झाल्यास त्यांना तातडीने पेईंग वार्डात उपचार दिले जातात. परंतु शासकीय दंत महाविद्यालयातील बाधितांना येथे साधारण वार्डात ठेवले जात असल्याने दोघांत भेदभाव होत असल्याची भावना दंतच्या डॉक्टरांकडून उपस्थित केली जात आहे. विशेष म्हणजे, दंतच्या डॉक्टरांना बुधवारी मेडिकलमध्ये ‘एक्स- रे’ साठीही तासंतास प्रतीक्षा करावी लागल्याने या भेदभावाच्या भावनेला बळ मिळाले आहे.

बुधवारी दंत महाविद्यालयातील चार डॉक्टरांसह एकूण सात जण बाधित आढळले. महापालिकेने यातील लक्षणे असलेल्या महिला सहायक प्राध्यापिकेला मेडिकलमध्ये आणले. या डॉक्टरला उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. त्यामुळे तातडीने पेईंग वार्डात दाखल करणे अपेक्षित होते. परंतु दाखल होण्यास काही तास लागले. इतरांना पेईंगऐवजी वार्ड क्रमांक ४९ मध्ये दाखल करण्यात आले. या सगळ्यांची क्ष-किरण तपासणी सायंकाळी सहानंतर झाली. दंतच्या अधिष्ठाता कार्यालयाकडूनही  चांगला उपचार उपलब्ध करण्यासाठी मदत केली जात नसल्याने दंत महाविद्यालयातील सर्वच विभाग प्रमुख संतापले.  दंतच्या अधिष्ठात्यांसह मेडिकल प्रशासनाने मात्र भेदभावाचा आरोप फेटाळला आहे.

कुणाही सोबत भेदभाव केला जात नाही. सध्या मेडिकलचे पेईंग वार्ड भरलेले आहेत. त्यामुळे मेडिकलचेही काही डॉक्टर दंतचे डॉक्टर उपचार घेत असलेल्या वार्डातच उपचार घेत आहेत. ‘एक्स- रे’च्या विलंबाबाबत कुणाची तक्रार नाही. उलट दंत प्रशासनाने येथील सुविधांबाबत समाधान व्यक्त केले आहे.

– डॉ. अविनाश गावंडे, वैद्यकीय अधीक्षक, मेडिकल.

मेडिकलचे  कर्मचारी सर्वाधिक बाधित ; मेडिकलमध्ये आजपर्यंत ९ डॉक्टर, ५ परिचारिका,

४ वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. यापैकी पाच डॉक्टरांवर उपचार सुरू असून इतर करोनामुक्त झाले आहेत. मेयो रग्णालयात आजपर्यंत ४ डॉक्टर आणि एका परिचारिकेला विषाणूची बाधा झाली असून  चार डॉक्टरांवर उपचार सुरू आहे. परिचारिका करोनामुक्त झाली आहे. एम्समध्ये १ डॉक्टर आणि इतर तीन अशा एकूण चौघांना बाधा झाली आहे.  एकावर उपचार सुरू आहेत.

दंत महाविद्यालयात बाधिताचा वावर

दंत महाविद्यालयातील करोना बाधित चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याचा भाऊ गुरुवारी महाविद्यालयात आला. त्याच्या भावाला मेडिकलमध्ये योग्य उपचार मिळत नसल्याची तक्रार त्याने एका अधिकाऱ्याकडे केली. यावेळी त्याने तोंडाऐवजी गळ्याला मुखपट्टी लावल्याचे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. त्यानंतर काही काळातच या तक्रारकर्त्यांलाही करोना झाल्याचा चाचणी अहवाल आला. बुधवारी बाधितांपैकी एका डॉक्टरने महाविद्यालय परिसरात शितपेयाची बाटली काही मुलांसोबत प्यायल्याचे समोर आले. त्यानंतरही दंत प्रशासनाकडून महाविद्यालयात निर्जंतुकीकरण केले नसल्याच्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. परंतु प्रशासनाने आरोप फेटाळत आवश्यक काळजी घेतल्याचा दावा केला.