डॉ. नितीन राऊत यांचा आरोप
केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यापासून दलित व मागासवर्गीयांवर अत्याचार वाढले आहेत. केंद्राने दलित व मागासवर्गीयांना दिल्या जाणाऱ्या निधीला कात्री लावली असून सगळ्या भागाची स्थिती बघितली तर दलित अत्याचारांमध्ये सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. इंदिरा गांधी कला केंद्राचे अध्यक्ष रामबहादूर राय यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला असून त्यांच्याविरोधात काँग्रेसचा अनुसूचित जाती विभाग राज्यभरात आंदोलन करेल, अशी माहिती राज्याचे माजीमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
डॉ. राऊत म्हणाले, मोदी सरकारने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे माजी महामंत्री रामबहादूर राय यांची इंदिरा गांधी कला केंद्राच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यानंतर राय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचे संविधान लिहीलेले नसून केवळ संविधानाची भाषा बदलल्याचा नवीन शोध लावला. एकीकडे नरेंद्र मोदी विदेशात बाबासाहेबांची प्रशंसा करीत असतांना त्यांचे नेते देशात बाबासाहेबांचा असल्या प्रकार अपमान करत असल्याचे अजब चित्र आहे. हा प्रकार भाजपकडून दलितांचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा कट दिसत आहे. काँग्रेस बाबासाहेबांचा अपमान खपवून घेणार नसून रामबहादूर राय यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन करेल.
संविधान चौकात १३ जून रोजी आंदोलन केले जाणार असून राज्यभरात वेगवेगळ्या तारखेत वेगवेगळ्या जिल्हास्तरावर आंदोलन होईल. बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या रामबहादूर यांच्यावर केंद्र सरकारने तातडीने राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून पदावरून हटवावे. सोबत त्यांच्याकडून देशाची माफी मागवून घ्यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली.
केंद्र व राज्य शासनाने दलित व मागासवर्गीयांच्या अनेक कल्याणकारी योजनांच्या निधीत कात्री लावण्याला सुरुवात केली आहे.
हा प्रकार योजना बंद करण्याचा घाट आहे. केंद्र व राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यावर दलित अत्याचारात २० टक्यांची वाढ झाली असून हा प्रकार काँग्रेस खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. पत्रकार परिषदेत संजय मेश्राम, राहुल साळवे, विवेक निकोसे उपस्थित होते.