आपत्कालीन व्यवस्था कुचकामी; बिग-बाजार, इटर्निटी मॉल, सिटी मॉलचा समावेश
उपराजधानीत मॉल संस्कृती रुजवण्यासाठी चकाचक आणि नागरिकांना आकर्षित करणारे मॉल्स ठिकठिकाणी उभे राहिलेत, बाहेरुन चकाचक दिसणाऱ्या या मॉल्समधील नागरिकांच्या अंतर्गत सुरक्षेचे काय? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर शोधूनही सापडणार नाही. यदाकदाचित मॉलमध्ये आग लागली, बॉम्बस्फोटाची कुणकुण लागली आणि त्यामुळे बाहेर पडण्यासाठी लोकांची दाटीवाटी झाली तर ‘आपत्कालीन मार्ग’ शोधावा लागतो. हा आपत्कालीन मार्ग सापडला तर त्याद्वारे एवढे लोक सुखरुपपणे बाहेर पडू शकतील की नाही, असे भलेमोठे प्रश्नचिन्ह शहरातील विविध मॉल्सचा फेरफटका मारल्यानंतर उभे राहते.
सीताबर्डीवरील बिग-बाजार, इटर्निटी मॉल, शुक्रवारी तलावाजवळचे एम्प्रेस सिटी मॉल, वर्धमान नगरातील बिगबाजार, रामदास पेठेतील सेंट्रल बाजार या शहरातील मॉल्समध्ये काही ठिकाणी आपत्कालीन मार्ग आहेत तर काही ठिकाणी नाहीत. ज्या मॉल्समध्ये ही पर्यायी व्यवस्था आहे, परंतू तेथे त्यासंबंधीची सूचना नाही. काही ठिकाणी आपत्कालीन मार्ग अशा ठिकाणी आहेत, जेथून बाहेर पडण्यासाठी पुन्हा एखाद्या आपत्कालीन मार्गाची व्यवस्था शोधावी लागते. अनेक मॉल्समध्ये आपत्कालीन मार्गाजवळच मॉलमधील सामान ठेवण्यात आले आहे. वर्धमाननगरातील बिगबाजारचा आपत्कालीन मार्ग वाहनतळाच्या ठिकाणी येऊन थांबतो.
याठिकाणी वाहनांची गर्दी असते आणि अशावेळी नागरिक कसे बाहेर पडणार, हा एक प्रश्नच असतो. याठिकाणी अग्निशमन यंत्रणाही नाही आणि विशेष म्हणजे नागरिकांच्या वापरासाठी हा मार्ग बंद असून केवळ मॉल्समधील कर्मचारीच या मार्गाचा वापर करतात. शहरातील सर्वात मोठय़ा एम्प्रेस सिटी मॉलमध्ये सहा ठिकाणी आपत्कालीन मार्ग आहेत, पण त्याची माहितीच मॉलमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना नाही.
सहा मार्गाची माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात चारच मार्ग आहेत आणि त्यांच्यासमोरच पॅन्टालून, बिगबाजारच्या शोरुम असल्यामुळे हा आपत्कालीन मार्ग की नेहमीच्या वहिवाटीचा मार्ग हे कळत नाही. रामदासपेठेतील सेंट्रल मॉलमध्येसुद्धा अशीच परिस्थिती आहे. आपत्कालीन मार्गाच्या बाजूला लिफ्ट आहे आणि त्याच्या बाजूलाच सामान ठेवण्यात आले आहे. त्याचठिकाणी वाहनतळसुद्धा आहे. अग्निशमन यंत्रणा ठिकठिकाणी आहे, पण नेमकी आपात्कालीन मार्गाच्या ठिकाणीच ती नाही. सीताबर्डीवरील बिगबाजार आणि इटर्निटी मॉल्समध्ये असलेले आपत्कालीन मार्ग चुकीच्या पद्धतीचे आहेत.
इटर्निटी मॉलमधील आपत्कालीन मार्गावर सायंकाळच्यावेळी प्रकाश कमी असतो. या मार्गाने खाली उतरले तर तो रस्ता थेट वाहनतळाच्या ठिकाणी पोहोचतो. सिनेमॅक्स या चित्रपटगृहाच्या बाजूला हा मार्ग असल्याने तो दिसत नाही. बिगबाजारमध्येसुद्धा आपत्कालीन मार्गाच्या ठिकाणी सामान ठेवण्यात आले आहे आणि त्याचठिकाणी काही दुकानेसुद्धा आहेत. एक आपत्कालीन मार्ग वाहनतळाच्या ठिकाणी आहे.
आपत्कालीन मार्ग नावापुरतेच
खासगी क्षेत्र असो वा सार्वजनिक या प्रत्येक ठिकाणी नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची असते. अलिकडच्या काळातील घटनांचा आढावा घेतल्यानंतर असुरक्षितता प्रत्येकच ठिकाणी आहे आणि नागरिकांसाठी सुरक्षा व्यवस्था ही आपल्याला निर्माण करायची आहे. प्रामख्याने सार्वजनिक ठिकाणी आग लागणे किंवा बॉम्बस्फोट यासारखे प्रकार कधीही घडू शकतात, अशावेळी आपत्कालीन व्यवस्था असणे गरजेचे आहे. मॉल हे असेच सार्वजनिक ठिकाण आहे आणि या ठिकाणी आपत्कालीन मार्ग असणे गरजेचेही आहे. मात्र, शहरातील प्रत्येक मॉल्समध्ये नावापुरते आपत्कालीन मार्ग असल्याचे दिसून आले. मुळातच या मार्गाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी अशी कोणतीही व्यवस्था या ठिकाणी नाही. ज्या ठिकाणी ही व्यवस्था आहे, ती आपत्कालीन व्यवस्था म्हणावी का, असे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. (क्रमश:)
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2016 रोजी प्रकाशित
ग्राहकांच्या सुरक्षा व्यवस्थेचे तीन तेरा!
मॉल्समधील नागरिकांच्या अंतर्गत सुरक्षेचे काय? असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर शोधूनही सापडणार नाही
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-02-2016 at 02:03 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Customers security system weak in nagpur malls