||मंगेश राऊत
नागपूर : करोनाच्या दृष्टचक्रात सर्वत्र गुन्हेगारी कमी होत असताना महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. त्याची कारणेही बेरोजगारी, रोजगारातील आव्हान, कौटुंबिक समस्या, नशेखोरी आदी आहेत. पण, याच काळात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये कमालीची घट नोंदवण्यात आली आहे. परीक्षा रद्द झाल्याने अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा सुखावह बदल दिसून येत आहे.

करोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांमध्ये पसरू नये म्हणून देशभरातील शाळा व महाविद्यालये दोन वर्षांपासून बंद आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंडळ, राज्य शिक्षण मंडळ आणि विविध विद्यापीठांनी परीक्षा रद्द केल्या असून अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारांवर विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले. यात दहावी व बारावीही अपवाद नाही. यामुळे सर्व शाळांचा निकाल जवळपास ९९ टक्के आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालावरून हे स्पष्ट होते. त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण नगण्य आहे.

दरवर्षी दहावी व बारावीच्या परीक्षा देणारे विद्यार्थी अनुत्तीर्ण होताच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत होते. परीक्षा रद्द झाल्याने अनुत्तीर्णांचे प्रमाण घटले व त्यासोबत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांही कमी झाल्या. २०१९ मध्ये परीक्षेत नापास झाल्यामुळे राज्यभरात ४३९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. यात सर्वाधिक प्रमाण ते १४ ते १८ आणि १८ ते ३० वयोगटातील होते. यात दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसह उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही समावेश असू शकतो.

पण, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये दहावी व बारावी अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचेच प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यात २४८ मुले व १९१ मुलींचा समावेश आहे. तर २०२० मध्ये परीक्षेतील अपयशामुळे २८७ विद्यार्थ्यांनी जीवनयात्रा संपवली. यात १३९ विद्यार्थी व १४८ विद्यार्थिनींचा समावेश आहे. दोन्ही वर्षांत विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या या वाईटच आहेत. पण, २०१९ च्या तुलनेत करोनाचा प्रादुर्भाव असलेल्या २०२० मध्ये आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. २०२१ मध्ये यात अजून घट होण्याची शक्यता आहे. ही माहिती राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून लोकसत्ताला प्राप्त झाली असून २०२१ ची आकडेवारी अद्याप संकलित करण्यात आली नाही.