एकाला अटक, दुसरा फरार

नागपूर : एका सावकाराला  १५ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व तडजोडीनंतर ५ लाखांचा पहिला हप्ता स्वीकारण्यासाठी आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याला अजनी पोलिसांकडून अटक करण्यात आली. त्याचा साथीदार  भाऊ फरार असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. दुसरा आरोपी हा युवासेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

संजोग सुरेश राठोड (रा. मानेवाडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो शिवसेनेत विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्याचा भाऊ विक्रम सुरेश राठोड (रा. मानेवाडा) हा फरार असून तो युवासेना जिल्हाधिकारी आहे. पारडी येथील  महबूब बादशाह शेख हे परवानाधारक सावकार आहेत. त्यांचे कार्यालय गणेशपेठ परिसरात  आहे. आरोपींनी त्यांच्याशी दहा दिवसांपूर्वी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला व त्यांचा सावकारीचा व्यवसाय  विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी १५ लाख रुपये द्यावे लागतील, अन्यथा परिणाम विपरित होतील, असे धमकावले. त्याला सावकारीचा परवाना रद्द करण्याचीही धमकी दिली. तेव्हापासून दोघेही भाऊ दररोज त्यांना धमकी देत होते. तडजोडीअंती आरोपी ८ लाख स्वीकारण्यास तयार झाले. हे सर्व संभाषण रेकॉर्ड करून शेख यांनी पोलिसांशी संपर्क साधला. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता मेडिकल चौक परिसरात आरोपी पैसे घेण्यासाठी येणार होते.  फिर्यादीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी सापळा रचला.  संजोग पैसे घ्यायला येताच शेख यांच्या इशारावर अजनीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष खांडेकर व त्यांच्या चमूने आरोपीला पकडले. धमकी देणाऱ्यांमध्ये विक्रमची मोठी भूमिका असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

पक्षाच्या नावावर दादागिरी

आरोपी शिवसेनेच्या नावाचा गैरफायदा घेऊन व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी वसूल करीत होते. पण, राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याने कुणी तक्रार द्यायला धजावत नव्हते. याशिवाय ते राजकीय पक्षाच्या नावाखाली दुचाकी व कार जप्तीचेही काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे.