मिहान-सेझमध्ये संरक्षण साहित्य आणि नागरी विमानाचे सुटे भाग तयार करण्याचे कारखाने उघडण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत आहे. हा क्रम असाच कायम राहिल्यास येत्या काही वर्षांत नागपूरची वाटचाल एव्हिएशन आणि डिफेन्स हबच्या दिशेने होणार आहे.

फ्रान्सकडून ३५ राफेल विमान खरेदीच्या करारानुसार नागपुरात दसॉल्त-रिलायन्स एअरोस्पेस लि. सुरू झाली असून उत्पादनही सुरू झाले आहे. याच कंपनीला सहविकासाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यांच्याकडे १११ एकर जमीन आहे. त्यातून ही कंपनी इतर कंपन्यांना जमीन वाटप करीत आहे. सध्या थॅल्स ग्रुपला पाच एकर जमीन देण्यात आली आहे. याशिवाय आणखी पाच कंपन्यांनी रुची दाखवली आहे. त्यांना डीआरएएल परिसरात जमीन दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त मिहान-सेझमध्ये नागरी विमान आणि संरक्षण साहित्य निर्मिती कारखाने येऊ घातले आहेत. टर्गिस गिलार्ड, जेएसआर डायमॉमिक्स आणि आणखी तीन-चार लहान कंपन्याही येथे गुंवतणूक करणार आहेत.

डीआरएएलमध्ये जेट फॉल्कन २००० या नागरी विमानाचे कॉकपीट नोझ बनवत आहे. २०२२ पर्यंत येथे संपूर्ण विमान तयार करण्याची योजना आहे. काही महिन्यांपूर्वी कॉकपीट नोझ येथे तयार ते करून फ्रान्सकडे रवाना करण्यात आले होते. थॅल्स ग्रुपला पाच एकर जमीन मिळाली आहे. ही कंपनी रडार निर्मिती करते. त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. टर्गिस गिलार्ड कंपनीने एमएडीसीकडून मिहानमध्ये दोन एकर जमीन घेतली आहे. ही कंपनी दारूगोळा वाहून नेणारी उपकरणे तयार करते.

अलीकडे जेएसआर डायमॉमिक्सला २७ एकर जमीन देण्यात आली आहे. ही कंपनी एअर मार्शल एस.बी. देव (निवृत्त) यांच्या पुढाकाराने नागपुरात उत्पादन करणार आहे. ही कंपनी ग्लाईड बॉम्ब, क्रुझ मिसाईल, मानवरहित विमान तयार करणार आहे. महाराष्ट्र सरकारने मिहानमध्ये डिफेन्स इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरसाठी २० एकर जमीन वितरित केली आहे. ही जमीन विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रिअल लि.ला दिली जाणार आहे.

दसॉल्त-रिलायन्स एअरोस्पेस लि.चे उत्पादन सुरू झाले आहे. थॅलेस ग्रुपचे पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण झाले आहे. टर्गिस गिलार्डचे काम सुरू झाले आहे. व्हीडीआयएलने परवानगीसाठी विकास आयुक्त, भारत सरकारकडे अर्ज केला आहे.

– सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक, एमएडीसी.