महेश बोकडे

उपराजधानीतील खासगी रुग्णालयांनी अत्यवस्थ करोनाबाधित रुग्णांना वाऱ्यावर सोडले असून, सौम्य लक्षणे आणि प्राणवायूची (ऑक्सिजन) गरज असलेल्या करोनारुग्णांनाच दाखल करून घेतले जात आहे. अत्यवस्थ रुग्णांना थेट मेडिकल, मेयो, एम्समध्ये पाठवले जात असल्याने येथे पूर्वीच्या तुलनेत मृत्यू वाढले आहेत. शहरात अत्यवस्थ रुग्ण दाखल करण्याची सोय असलेली सहाच खासगी रुग्णालये असून इतरत्र सोयींना मर्यादा असल्याचा विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचा दावा आहे.

जिल्हा प्रशासन आणि नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागानुसार, शहरात सध्या शासकीय व खासगी रुग्णालये मिळून सुमारे ३ हजार खाटा करोनाबाधित रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. पैकी १,२५० खाटा मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयांतील आहे, तर इतर खाटा जिल्ह्य़ातील सुमारे ३५ विविध संवर्गातील खासगी रुग्णालयांतील आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णालय, मध्यम वर्गाच्या रुग्णांसाठीचे रुग्णालय आणि कोविड केअर सेंटर अशी विभागणी आहे. त्यातील अत्यवस्थ रुग्ण हे केवळ टर्शरी दर्जाच्या कोविड रुग्णालयांतच ठेवले जातात. परंतु खासगी रुग्णालयांमध्ये महापालिका दाखवत असलेल्या खाटांच्या तुलनेत सुमारे २५ ते ३५ टक्के खाटा अद्याप कमी उपलब्ध आहेत.

या प्रकारामुळे शहरातील मेडिकल, मेयो, एम्स या शासकीय रुग्णालयांवर ताण वाढत असून, खासगी रुग्णालयांमध्ये तुलनेत कमी खाटा असल्याने रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच खासगी रुग्णालये गृह विलगीकरणात उपचार शक्य असलेल्या सौम्य लक्षणाच्या रुग्णांना जास्त संख्येने दाखल करत असल्याने येथेही ऑक्सिजनची गरज असलेल्यांसह अत्यवस्थ रुग्णांना दाखल करण्यात मर्यादा येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना खासगी रुग्णालये व्हेंटिलेटर नाही, ऑक्सिजनची सोय असलेल्या खाटा उपलब्ध नसल्याचे सांगत सपशेल नाकारत आहेत.

होतेय काय?

सध्या खासगी रुग्णालयांमध्ये बाधितांची संख्या खूपच वाढली आहे. त्यातील ऑक्सिजनवरील काही रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागू शकते. त्यामुळे खासगी रुग्णालयांना काही व्हेंटिलेटरच्या खाटा आमच्याच रुग्णालयातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांसाठी ठेवाव्या लागतात. त्यामुळे खाटा असल्यास रुग्ण दाखल केला जातो, अन्यथा इतरत्र त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती विदर्भ हॉस्पिटल असोसिएशनचे समन्वयक डॉ. अनुप मरार यांनी दिली. तर अध्यक्ष डॉ. अशोर अरबट म्हणाले, संक्रमित होणाऱ्यांत आता खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे सुमारे प्रत्येकी ५ खाटा खासगी रुग्णालयांना आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ठेवाव्या लागतात.

केवळ ९० व्हेंटिलेटर : महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार शहरातील करोनाग्रस्तांवर उपचारासाठी उपलब्ध खासगी रुग्णालयांमध्ये सध्या सुमारे ९० व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. पैकी ३१ अत्यवस्थ रुग्णांवर उपचाराची मंजुरी असलेल्या कोविड रुग्णालयांतील आहेत, तर इतर रुग्णालयांतही व्हेंटिलेटर आहे. परंतु रामदास पेठमधील एक खासगी रुग्णालय अद्याप पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले नसून तेथे १७ व्हेंटिलेटर दाखवले गेले आहेत, तर इतरही चार ते पाच रुग्णालयांमध्ये अद्यापही बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण घेतल्याने महापालिकेकडून दाखवलेले व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. शासकीय रुग्णालयांपैकी मेडिकलमध्ये ८७, मेयोत ८५, एम्समध्येही काही व्हेंटिलेटर दाखवण्यात आले आहेत.