प्रतीक्षा यादी नसल्याने अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) यंदाच्या निकालामधून आधीच ‘गट अ’ पदावर नियुक्त असतानाही पुन्हा परीक्षा देऊन त्याच पदावर निवड झालेल्या उमेदवारांमुळे एक-दोन गुणांनी अपयश आलेल्या विद्यार्थ्यांना मोठा फटका बसत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे.

राज्यातून महिला वर्गातून पहिल्या आलेल्या उमेदवार या आधीच उपराजधानीमध्ये परीविक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू असतानाही त्यांनी पुन्हा उपजिल्हाधिकारी पदासाठी परीक्षा दिल्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची ओरड विद्यार्थी करीत आहेत. दरवर्षी ३ ते ४ लाख विद्यार्थी प्रशासनात येण्याचे स्वप्न घेऊन या परीक्षेची तयारी करतात. राज्यसेवा परीक्षांद्वारे उपजिल्हाधिकारी गट अ पदासह १७ पदांसाठी परीक्षा घेतली जाते. यात गट ब पदावर नियुक्त होणारे अनेक उमेदवार हे पदोन्नतीसाठी पुन्हा परीक्षा देतात. यात गैर असे काहीच नाही. मात्र, उपजिल्हाधिकारी पदावर आधीच नियुक्त असतानाही काही उमेदवारांनी पुन्हा परीक्षा देऊन त्याच पदासाठी उत्तीर्ण झाल्याने याचा अन्य परीक्षार्थीना मोठा फटका बसल्याचे निकालावरून दिसून आले आहे. राज्यसेवेमध्ये प्रतीक्षा यादी नसल्याने एक-दोन गुणांमुळे ज्यांची निवड होऊ शकली नाही, असे उमेदवार हताश होतात. आधीच गट अ पदावर नियुक्त असतानाही केवळ श्रेणीवाढ करण्यासाठी अनेक उमेदवार अन्य परीक्षार्थीच्या भविष्याशी खेळ करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

झाले काय?

सध्या नागपुरात उपजिल्हाधिकारी पदावर असलेल्या पर्वणी पाटील यंदा महिला वर्गातून राज्यात प्रथम आल्या. मात्र, आधीच उपजिल्हाधिकारीपदी असतानाही पाटील यांनी पुन्हा परीक्षा का दिली, असा सवाल आता विचारला जात आहे. एका गुणाने ज्या उमेदवाराचे उपजिल्हाधिकारी पद गेले त्यासाठीही पाटील यांना जबाबदार ठरवले जाऊ लागले आहे. यासंदर्भात पाटील यांना विचारण केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. मात्र फेसबुकवर दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, २०१७च्या निकालावर मुलींच्या आरक्षणासंदर्भात एका खटल्याचा निकाल सप्टेंबर २०१९ला जाहीर झाला. या निकालामुळे बऱ्याच मुलींच्या पदामध्ये बदल झाला असून त्यात पाटील या तहसीलदार पदावरून थेट उपजिल्हाधिकारी झाल्या. मात्र, न्यायालयाच्या या निकालाविरुद्ध पुन्हा दावा दाखल करण्यात आला आहे. त्यात पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांनी २०१९ची मुलाखत दिली. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीचे गुण चांगले आल्याने त्या राज्यात मुलींमधून पहिल्या आल्या अशी माहिती त्यांनी दिली आहे.

परीक्षार्थी काय म्हणतात?

राज्यसेवेसाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतात. त्यात आधीच गट अ पदावर नियुक्त असलेले अधिकारी पुन्हा परीक्षा देत असल्याने अनेकांचे नुकसान होते. यामुळे बेरोजगारीची झळ सोसणाऱ्या अनेकांना फटका बसतो. यावर विचार व्हायला हवा.

– प्रणय खंडाईत (परीक्षार्थी)

विद्यार्थ्यांच्या अपयशाच्या कारणांचा शोध घेतल्यास  ज्या विद्यार्थ्यांची आधीच वर्ग १ व वर्ग २ पदावर निवड झाली  त्यांनी परत परीक्षा दिल्याने त्यांची त्याच पदांवर निवड होणे हे एक कारण सापडते. एमपीएससीला प्रतीक्षा यादी नसल्यामुळे एक दोन गुणांमुळे ज्यांची निवड होऊ शकली नाही, त्यांना परत तयारी करताना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. 

– अंकुश मराठे (परीक्षार्थी)