• भाजपच्या पक्षांतर्गत सर्वेक्षणात नागरिकांचा संताप

  • महापौर, सभापतींचाही समावेश

नागपूर : महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील ५० पेक्षा अधिक विद्यमान सदस्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, असा सूर पक्षाने केलेल्या एका सर्वेक्षणातून उमटला असल्याची माहिती समोर आली आहे.

महापालिकेची आर्थिक स्थिती बघता सत्ताधारी भाजपच्या अनेक नगरसेवकांच्या प्रभागातील विकास कामांसाठी निधी न मिळाल्यामुळे काही नगरसेवकांची नाराजी लपून राहिलेली नाही. पण, उघडपणे यावर कोणी बोलायला तयार नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीचे विविध राजकीय पक्षांना वेध लागले आहे. त्यात विविध राजकीय पक्षांकडून विद्यमान नगरसवेकांचा गेल्या चार वर्षांचा विकास कामांसंबंधी अहवाल तपासून पक्षातंर्गत सर्वेक्षण करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागात हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात बहुतांश ज्येष्ठ व काही २०१७च्या निवडणुकीत पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांना पुन्हा संधी देऊ नका असा सूर उमटला.

यामध्ये माजी महापौर, माजी स्थायी समिती अध्यक्ष, सभापतींपासून अनेक ज्येष्ठ व नवीन सदस्यांचा समावेश आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोनाच्या महामारीमुळे विविध भागातील विकास कामे ठप्प पडली आहे. या काळात नागरिकांना मदतीची गरज असताना अनेक नगरसेवक नागरिकांकडे फिरकले नसल्याची माहिती सर्वेक्षणात समोर आली आहे. तसेच २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अनेक महिला नगरसेविका सक्रिय नसल्याचे समोर आले आहे.

दोन आठवडय़ापूर्वी महापालिका सभेच्या निमित्ताने झालेल्या सदस्यांच्या बैठकीत अनेक नगरसेवकांना प्रभागात सक्रिय व्हा अशी समज वरिष्ठांकडून देण्यात आली. यापूर्वी पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी विद्यमान नगरसेवकांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती. विकासकामे होत नसल्याने भाजपसह अन्य पक्षांचे नगरसेवक नाराज आहेत. भाजपच्या अनेक नगरसेवकांना विकासकामांसाठी निधी मिळाला. तर, काहींच्या फाईल अद्याप धूळखात आहेत, याबद्दल नाराजी आहे. काही नगरसेवकांबाबत जनतेची नाराजी बघता इतर सक्रिय पदाधिकाऱ्यांनी प्रभागात कामे सुरू करत वरिष्ठाच्या मार्फत उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केली असल्याचे दिसून येते.

नगरसेवक बेपत्ता झाल्याची तक्रार

संघ मुख्यालय परिसराला लागून असलेल्या प्रभाग क्रमांक २२ मध्ये श्रद्धा पाठक, राजेश घोडपागे, वंदना यंगटवार आणि मनोज चाफले हे चारही नगरसेवक भाजपचे असून येथे गेल्या चार वर्षांत कुठलीच विकासकामे झाली नसल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. हे चारही नगरसेवक प्रभागात फिरकत नसल्यामुळे ते बेपत्ता झाले आहे त्यांना शोधून द्या, अशी तक्रार विदर्भ राज्य पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात केली आहे.

गेल्या चार वर्षांत सर्वच नगरसेवकांनी कामे केली. मात्र करोना काळात घराबाहेर पडता येत नसल्यामुळे अनेक प्रभागात कामे झाली नाही. त्यामुळे लोकांची नाराजी स्वाभाविक आहे. पक्षातील सदस्यांच्या विकास कामाबाबत दर एक वर्षांने माहिती मागितली जाते. त्यानुसार त्यांना सक्रिय होण्याच्या सूचना केल्या जातात. निवडणुकीला आठ महिन्यांचा काळ आहे त्यामुळे कोणाला उमेदवारी द्यावी आणि कोणाला नाही हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय राहणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये चारही नगरसेवकांनी कामे केली आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत कुठलीही तक्रार नाही.

– गिरीश व्यास, प्रदेश प्रवक्ता, भाजप