• ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांचा सल्ला
  • लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

परीक्षा कुठलीही असो, वर्षभर अभ्यास आणि शिकवणी वर्ग केले तरी विद्यार्थ्यांच्या मनावर ताण असतोच. बारावीची परीक्षा सुरू असून मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. या दिवसात अनेकदा पेपर खराब गेले म्हणून अनेक विद्यार्थ्यांना नैराश्य आले आणि त्याचा परिणाम अन्य पेपरवरही झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला जाण्यापूर्वी काय करावे आणि कुठल्या गोष्टी करू नये, यासंदर्भात ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक डॉ. सुधीर भावे यांनी विद्यार्थ्यांना या काळात तणावमुक्त राहण्याचा सल्ला दिला आहे.

डॉ. सुधीर भावे यांनी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, परीक्षेच्या दिवसात विद्यार्थ्यांनी रात्री जागरण न करता किमान रोज ६-७ तास झोप आणि जेवण वेळेवर घेणे आवश्यक आहे. परीक्षा आहे म्हणून फार ताण घेता कामा नये. तेलकट किंवा त्रास होईल, असे पदार्थ खाऊ नये. पहिला पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या पेपरचा विचार न करता दुसऱ्या पेपरचा अभ्यास करावा. पेपर सोडवून विद्यार्थी घरी आले की, पालकांनी आणि मित्रांनी त्याला पेपर कसा गेला किंवा काय काय सोडवले, असे प्रश्न विचारू नये, त्यामुळे विद्यार्थ्यांंवर जास्त ताण येतो. अनेकदा प्रश्नपत्रिका मिळाल्यावर काय करावे सुचत नाही. अशा वेळी दोन मिनिटे डोळे बंद करून दीर्घ श्वसन केले, तर बऱ्याच अंशी ताण कमी होतो. परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी किमान २ तास आधी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहावे. अभ्यासाचे किंवा संबंधित विषयाचे वाचन करू नये, ज्यावेळी जीव घाबरल्यासारखा होतो त्यावेळी साखर किंवा चॉकलेट खावे, प्रश्नपत्रिका समोर आली की, जे प्रश्न येतात ते प्रथम सोडवून घ्यावे. प्रश्नपत्रिका सोडविताना वेळेचे भान ठेवणे आवश्यक आहे. तणावमुक्त होण्यासाठी शांत मन ठेवून ध्यानधारणा करणे आवश्यक आहे. उरलेले पेपर कसे चांगले सोडविता येतील, याचा विचार करावा. पालकांनी परीक्षा केंद्रावर मुलाला सोडल्यानंतर आणि घेण्यासाठी आल्यावर त्याच्याशी पेपरसंदर्भात कुठलीही चर्चा करू नये.

पूर्वी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण आता बरेच कमी झाले असले तरी यामागे मुलांची मानसिकता, हे कारण आहे. घरातील ताणतणावांचा परिणाम मुलांवर होतो. त्यांची प्रतिकार शक्ती कमी होते. मानसिकदृष्टय़ा तो त्याच पद्धतीने विचार करतो. त्यात पालकांच्या अपेक्षा वाढलेल्या असल्यामुळे तो सतत तणावात असतो.

त्याची चिडचीड वाढते, अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्यातून नैराश्य येते. पालकांनी मुलांकडून अपेक्षा ठेवणे गैर नाही. मात्र, त्यांचा बुद्धयांक, मानसिकता, घरातील वातावरण, त्यांची आवड, या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. जबरदस्तीने अभ्यास करून घेण्यापेक्षा प्रोत्साहन देऊन त्याला अभ्यासासाठी बसविले की, त्याचा परिणाम सकारात्मक दिसतो.

शिवाय, पालकांनी शेजारच्या मुलांशी आपल्या मुलाची कधीही तुलना करू नये, त्यामुळे अनेकदा मुलांमध्ये नैराश्य येते. तो बोलत नाही, पण मनात ठेवतो आणि ते मुलांच्या दृष्टीने जास्त घातक आहे. त्यामुळे पालकांनी मुलांकडून फार ठोस अपेक्षा ठेवू नये. पूर्वी केवळ डॉक्टर व इंजिनीअरसाठी स्पर्धा होती. मात्र, आता खूप जणांचा कल सॉफ्टवेअरकडे वाढला

आहे. त्यामुळे मुलांच्या मनाप्रमाणे पालकांनी निर्णय घ्यावा. आज विद्यार्थ्यांपेक्षा खरे तर पालकांचेच समुपदेशन करण्याची गरज असल्याचे डॉ. भावे म्हणाले.

.. त्यावर पालकांचेच नियंत्रण आवश्यक

लहान वयातच मुलांच्या हाती मोबाईल, टॅब, संगणक आदी अत्याधुनिक साधने आली, पण त्याचा उपयोग काही ठिकाणी चांगल्या कामासाठी केला जात असला तरी त्यातून गैरप्रकारही वाढले आहेत. ही साधने कुठल्या मर्यादेपर्यंत त्यांनी वापरावी, यावर पालकांचे नियंत्रण असणे आवश्यक असले तरी आजचा  पालकच व्हॉटसअ‍ॅप आणि इंटरनेटच्या विळख्यात सापडल्यामुळे त्यांचेच समुपदेशन करण्याची गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मोबाईल आणि संगणकामुळे पालकांचा घरातच मुलांसोबतच संवाद न राहिल्यामुळे मुलेही या साधनांच्या आहारी गेलेली आहेत. पालकांचे त्यावर नियंत्रण राहिले नाही. सायबर सायकॉलॉजी मोठय़ा प्रमाणात वाढलेली असताना त्यावर काम करण्याची गरज आहे. सहा महिन्याचे मूल आईच्या मांडीवर खेळत असते. आई मात्र मोबाईलवर व्हॉटस्अप चॅटिंग करीत असते. पुढे किशोरवयात मुलांच्या आणि पालकांच्याही हाती मोबाईल असतो आणि त्याचा परिणाम मुलांच्या आयुष्यावर होतो. मिडिया एक्सफोझर मोठय़ा प्रमाणात वाढले असून त्याचा सकारात्मक उपयोग होत असला तरी दुष्परिणामही पुढे येत आहेत. येणाऱ्या काळात ते फार घातक ठरणार आहे. त्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढविण्याची गरज आहे. फोनोग्राफी ऑनलाईन शॉपिंग वाढल्यामुळे मुलेही त्याचा उपयोग करू लागले. त्यावरही पालकांचे नियंत्रण राहिलेले नाही.