उदित राज यांचा दलित नेत्यांना टोला
स्वत:च्या राजकीय फायद्यासाठीच दलित नेते जातीयवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करून भाजपचे खासदार व अनुसूचित जाती व जमाती संघटनांच्या राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष डॉ. उदित राज यांनी दलित नेत्यांना आपसातील मनुवाद संपवून समाजाच्या कल्याणासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. रविवारी रविभवनातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
जातीयवाद ही सामाजिक समस्या असून ती सोडवण्यासाठी साहित्यिक व पत्रकारांनी पुढाकार घ्यावा. राजकारण्यांचे हे काम नव्हे, असेही स्पष्ट करून ते म्हणाले, एखाद्या दलितावर अन्याय झाल्याची घटना घडली की, दलित संघटना एकत्र येतात, पण प्रत्यक्षात ते स्वत: आपापसात जातीयवाद करतात. प्रथम तो दूर करायला हवा. काही लोक राजकीय फायद्यासाठी दलित अन्यायाचा मुद्दा पुढे करतात. यापेक्षा दलितांच्या हक्कासाठी लढा दिला, तर समाजाचे कल्याण होईल. काही नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दलित नेते म्हणून एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त केले, ते चुकीचे आहे.
शैक्षणिक संस्थांमधील जातीयवादाकडे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले की, ‘एम्स’सारख्या संस्थांमध्येही अलीकडे ही बाब प्रखरपणे पुढे येऊ लागली आहे. हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील रोहित वेमुलापूर्वी आठ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा त्याविरुद्ध कोणीच आवाज उठविला नाही. आता मात्र या मुद्दय़ावरून भाजपवर दोषारोपण केले जात आहे. हैदराबाद विद्यापीठात यापूर्वी झालेल्या आत्महत्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.