दिवाळीमध्ये तहसील पोलिसांना १० लाख सापडले

दिवाळीमध्ये तहसील पोलिसांनी हवालाचे दहा लाख रुपये एका दुचाकीतून घेऊन जात असताना पकडले होते, या प्रकरणाची चौकशी आता सक्तवसुली संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाकडून करण्यात येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरातील हवाला व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या १४ ऑक्टोबरला एका दुचाकीतून मोठय़ा प्रमाणात रोख रक्कम नेत असताना तहसील पोलिसांनी सापळा रचून ईमली चौकाकडून सेवासदन चौकाकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच-४९, वाय-८९२२) थांबवून चौकशी केली असता वाहनाच्या डिक्कीत १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांचे १० लाख रुपये सापडले. पोलिसांनी चालक अजय लक्ष्मणराव पुनवटकर (४०) रा. फुलमती लेआऊट, रामेश्वरी रिंगरोड याच्याकडे चौकशी केली असता ते पैसे महेश अग्रवाल, जगदीश अग्रवाल यांचे असल्याची माहिती समोर आली. मात्र, पैसे त्याने एशियन डेकोरमधून हाजी नावाच्या व्यक्तीकडून घेऊन आला होता. मात्र, नोटांच्या पुराव्याबाबत पोलिसांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी दुचाकी आणि रक्कम जप्त केली. या पैशाचा अद्यापही हिशेब सादर करण्यास त्यांना यश आले नाही. त्यामुळे ही रक्कम पोलिसांच्या ताब्यात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा पैसा हवालाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे तहसील पोलिसांनी त्याच्या पुढील तपास ईडी आणि आयकर विभागाने करावा, अशी विनंती केली.

शहरात मोठय़ा प्रमाणात हवाला व्यापार

शहरात मोठय़ा प्रमाणात हवालाचा व्यापार चालतो. मात्र, हा पैसा कुठून येतो आणि तो कुठे जातो, याचा शोध पोलीस घेत नाहीत. ५ एप्रिल २०१६ मध्ये गणेशपेठ पोलिसांनी एका ऑटोरिक्षातून जात असलेले १ कोटी ७० लाख रुपये पकडले होते. त्यानंतर त्याचे काय झाले, हे समजायला मार्ग नाही. शहरातील हवाला व्यापारासंदर्भात गुन्हे शाखेतील अनेक हवालदारांना माहिती आहे. मात्र, ते हवाला व्यापाऱ्यांवर कारवाई न करता त्यांच्याकडील लक्ष्मीदर्शन घेऊन परततात, हे विशेष.

हवाला व्यापाऱ्यांवर कारवाई होणार

हवाला व्यापारासंदर्भात गुन्हे शाखेकडून माहिती गोळा करण्यात येत आहे. हवाला व्यापाऱ्यात गुंतलेल्यांची यादी तयार करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

– संभाजी कदम, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.