करोनाचे रुग्ण वाढत असून गरजेच्या तुलनेत व्हेंटिलेटर कमी पडण्याचा धोका जागतिक आरोग्य संघटनेने वर्तवला आहे. त्यावर उपाय शोधत नागपूरचे हृदय प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. आनंद संचेती यांनी प्लास्टिकचे अद्ययावत स्प्लिटर विकसित केले आहे. हे दोन स्प्लिटर एका व्हेंटिलेटरला लावल्यास त्यावर आठ रुग्णांना एकाच वेळी प्राणवायू पुरवणे शक्य होईल.

भारतात सध्या केवळ ५० ते ६० हजारांच्या जवळपास व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. येथे रुग्ण वाढल्यास व्व्हेंटिलेटर्सचा तुटवडा निर्माण होण्याची भीती असल्याने केंद्र सरकारने काही खासगी कंपनीच्या मदतीने त्याचे उत्पादन वाढवले आहे.

प्रत्यक्षात हे व्हेंटिलेटर यायला काही अवधी लागेल. परंतु नागपूरच्या डॉ. आनंद संचेती यांनी व्हेंटिलेटरच्या तुटवडय़ावर तोडगा काढण्यासाठी शहरातील प्लास्टिक पाईपसह इतर वस्तूंचे उत्पादक आणि सारस लाईफ सोल्युशन, बुटीबोरी या कंपनीचे मालक समीर भुसारी, सिद्धार्थ भुसारी यांच्या मदतीने थ्री डी प्रिंटिंग तंत्राने स्प्लिटर विकसित केले. या तंत्रात संगणकावर विशिष्ट कार्यक्रम टाकून स्वयंचलित पद्धतीने हे डिव्हाईस तयार होते. या लहान चेंडूच्या आकाराच्या दोन स्प्लिटरला एक व्हेंटिलेटरमधून निघणाऱ्या दोन तोडीला लावले जाते. या दोन्ही स्प्लिटरमधून प्रत्येकी आठ इतर पाईप निघेल अशी सोय आहे. हे पाईल व्हेंटिलेटरमधून रुग्णांसाठी निघणारा कृत्रिम प्राणवायू देता येते. त्याचे प्रात्यक्षिक इतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या झाले, अशी माहिती न्यू ईरा रुग्णालयाचे संचालक डॉ. आनंद संचेती यांनी दिली.

सध्या बेंगळुरू येथे दोन रुग्णांना तर चेन्नईत चार रुग्णांना एकच व्हेंटिलेटर लावणे शक्य असलेले स्प्लिटर डिव्हाईस उपल्बध आहे. परंतु नागपुरात ८ रुग्णांत ते लावणे शक्य असलेले स्प्लिटर विकसित झाले असून ते देशातील पहिले आहे. त्याने व्हेंटिलेटरच्या तुटवडय़ावर आंशिक दिलासा मिळेल. हे डिव्हाईस अत्यवस्थ रुग्णांना हाताळणाऱ्या तज्ज्ञांच्या राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय परिषदेतही सादर करणार आहे.