सराफा व्यापाऱ्यांची सरकारकडे मागणी

नागपूर : केंद्र सरकारने सोन्यावर हॉलमार्क कायदा लागू केला असून त्याचा परवाना घेण्यासाठी सराफा व्यापाऱ्यांची धावपळ होत आहे. शहरात केवळ एकच हॉलमार्क प्रयोगशाळा असून त्यांची संख्या वाढवावी, जेणेक रून व्यापारी आणि ग्राहकांना त्रास होणार नाही, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे.

नागपुरात छोटे मोठे तीन हजारावर सराफा व्यापारी आहे. त्यांचे ग्राहक केवळ विदर्भातील नसून इतर राज्यातीलसुद्धा आहेत. मात्र आता हॉलमार्क कायदा लागू झाल्याने सर्वाची परवाना मिळवण्यासाठी धडपड सुरू आहे. परंतु शहरात केवळ एकच हॉलमार्क प्रयोगशाळा असल्याने अनेक व्यापाऱ्यांना व्यवसायात अडचणी येत आहेत. सराफा व्यापाऱ्यांच्या मते जिल्’ाची लोकसंख्या बघता हॉलमार्क प्रयोगशाळा सुरू करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक जिल्’ात एक प्रयोगशाळा असलीच पाहिजे. काही ठिकाणी प्रयोगशाळा नाहीत. विदर्भात केवळ तीन ठिकाणी हॉलमार्क प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांना इतर शहरात जावे लागते. त्यात त्यांचे नुकसान होत असून ते ग्राहकांना वेळेत दागिने देऊ शकत नाही. सरकारने कोणताच विचार न करता हॉलमार्क कायदा लागू केला. त्याचा विरोध करत नाही. मात्र कोणत्या शहरात कोणत्या कॅरेटचे सोने अधिक विक्री होते त्याप्रमाणे या कायद्यात बदलाची गरज आहे असे  व्यापाऱ्यांचे मत आहे.

शिवाय ज्या सराफा व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल दोन कोटींपेक्षा कमी आहे, अशांना या कायद्यातून सूट मिळावी अशी मागणी सराफा व्यापाऱ्यांनी केली आहे. मात्र ती प्रलंबित असल्याने छोटय़ा सराफा व्यापाऱ्यांचे अधिक नुकसान होत आहे.

हॉलमार्क कायद्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र यात त्रुटी आहेत. विदर्भात केवळ तीन हॉलमार्क प्रयोगशाळा आहे त्यांची संख्या सरकारने वाढवावी. शिवाय छोटय़ा व्यापाऱ्यांना यातून सूट द्यावी, अशी आमची मागणी आहे.

– पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष महाराष्ट्र सुवर्णकार समाज