नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटल्यानंतर मान्यता; उपराजधानीत ११ महिन्यानंतर शस्त्रक्रिया
उपराजधानीतील कठाळकर कुटुंबातील १७ वर्षीय मुलाचा अपघात झाला. खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले, परंतु मुलाची प्रकृती जास्तच खालावली. डॉक्टरांकडून मुलाला ‘ब्रेन डेड’ घोषित केल्यावर त्याच्या नातेवाईकांना अवयव दानाचे महत्व सांगण्यात आले. त्यांनी मोठे मन करून त्याला मान्यता दिल्याने शहरातील दोघांना किडनी दानामुळे जीवदान मिळाले, तर मुलाचे डोळे एका नेत्रपेढीला दिल्या गेल्याने दोघांना नवीन दृष्टी मिळणे शक्य झाले आहे. शहरात ब्रेन डेड रुग्णाची ही ११ महिन्यानंतर झालेली शस्त्रक्रिया आहे.
गोपाल विजय कठाळकर (१७) असे मृताचे नाव आहे. मुलाचे वडील विजय यांची शैक्षणिक संस्था आहे. गोपालला १९ फेब्रुवारीला रात्री अपघात झाला. गंभीर अवस्थेत गोपालला वोक्हार्ट रुग्णालयात हलवण्यात आले. गोपालच्या मेंदूत रक्तस्त्राव व बरेच फॅक्चर बघून डॉक्टरांकडून त्वरित शस्त्रक्रियेचा निर्णय नातेवाईकांच्या मंजुरीनंतर घेतला, पण यानंतर गोपालची प्रकृती जास्तच खालावू लागली. डॉक्टरांकडून बरेच प्रयत्न केल्यावरही त्यांना यश मिळाले नाही. शेवटी, बुधवारी (२५ फेब्रुवारी) डॉक्टरांकडून गोपालचे ब्रेन डेड झाल्याचे घोषित करण्यात आले. याप्रसंगी डॉक्टरांनी कठाळकर कुटुंबाला धीर देऊन मुलाच्या अवयव दानाने दुसऱ्या रूपात गोपाल जगात राहणे शक्य असल्याचे सांगितले.
कठाळकर कुटुंबाने मोठे मन करून त्याला परवानगी दिली. तातडीने रुग्णालयाकडून कायदेशीर अडचणी येऊ नये याकरिता किडनी प्रत्यार्पणाकरिता काही अडचणीनंतरही राज्यातील किडनी प्रत्यारोपण विभागाच्या नोडल अधिकारी डॉ. गौरी राठोड यांना परवानगी मागितली. विलंब होऊन अवयव वाया जाण्याची शक्यता बघता त्यांनीही मानवीय दृष्टीकोनातून परवानगी देण्याचे धाडस दाखवले. त्यानंतर शहरातील वोक्हार्ट व ऑरेंज सिटी या दोन्ही खाजगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची तयारी पूर्ण झाली.
दोन्ही शस्त्रक्रिया बुधवारी यशस्वी झाल्या. त्याने दोन रुग्णांना जीवदान मिळाले आहे. सोबत गोपालचे दोन्ही डोळे नेत्रपेढीला दान दिल्याने दोघांना नवीन दृष्टी मिळणे शक्य झाले आहे.
ब्रेन डेड रुग्णावर शहरात ही तब्बल ११ महिन्यानंतर शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे. वोक्हार्ट रुग्णालयात डॉ. संजय कोलते यांनी, तर ऑरेंज सिटी रुग्णालयात डॉ. राजेश सोनी यांनी ही शस्त्रक्रिया केली. दोन्ही रुग्णालयातील इतर वैद्यकीय पथकांनी त्यांना मदत केली. या घटनेतून समाजाने अवयवदानातून अनेकांना जीवदान शक्य असल्याने त्याकरिता पुढाकार घेण्याची गरज पुढे आली आहे. दरम्यान, नेत्रपेढीकडूनही लवकरच नेत्रदानातून दोघांना हे सुंदर जग बघण्याची संधी उपलब्ध होणार आहे.