|| महेश बोकडे

 

मेडिकलच्या निवासी डॉक्टरांवरील अभ्यासातील निष्कर्ष :- लठ्ठ व्यक्तींवर उपचार करताना डॉक्टर औषधोपचारासह वजन कमी करण्याचा सल्ला देतात. परंतु फास्ट फूड्सह इतर खानपानाच्या वाईट सवयींमुळे आता डॉक्टरांनाच लठ्ठपणाने ग्रासल्याचे पुढे येत आहे. मेडिकलमधील निवासी डॉक्टरांवरील अभ्यासात ४१ टक्के डॉक्टर लठ्ठ असल्याचे  पुढे आले आहे.

खासगी अथवा शासकीय रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्या हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेहासह इतर लठ्ठ संवर्गातील प्रत्येक रुग्णांना डॉक्टरांकडून फास्ट फूड, जंक फूडसह जास्त तेल, तिखट, मिठाचे पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु देशात लोकसंख्येच्या मानाने आजही डॉक्टरांची संख्या कमी आहे. कामाचा व्याप जास्त असल्याने या डॉक्टरांना वेळेवर न्याहारी, जेवण मिळत नाही. त्यामुळे अनेक डॉक्टरांना लठ्ठपणाचा सामना करावा लागत आहे. मेडिकलने येथील ३०४ निवासी डॉक्टरांची वर्ष २०१८ मध्ये वैद्यकीय तपासणी केली. त्यात निवासी डॉक्टरांचे वय आणि उंचीच्या तुलनेत वजनाचा अभ्यास झाला. एकूण डॉक्टरांमध्ये ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के स्त्रियांचा समावेश होता. निरीक्षणात १२५ डॉक्टर (४१ टक्के) लठ्ठ असल्याचे स्पष्ट झाले. ७६ डॉक्टर (२५ टक्के) लठ्ठपणाच्या उंबरठय़ावर तर १३ (४.३ टक्के) डॉक्टर कमी वजनाचे असल्याचे पुढे आले. ९० डॉक्टर (२९.६ टक्के) सामान्य वजनाचे असल्याचे पुढे आले. एकूण विद्यार्थ्यांत जेआर १ संवर्गातील १४७ विद्यार्थी, जेआर- २ संवर्गातील ७२ आणि जेआर ३ संवर्गातील ८५ निवासी डॉक्टरांचा समावेश  होता.

खाण्यातील अनियंत्रितपणाकडे दुर्लक्ष

मेडिकलमधील ५० टक्के निवासी डॉक्टरांनी आठवडय़ात तीन ते चार दिवस सकाळची न्याहारी न घेणे, २० टक्के डॉक्टरांनी दुपारचे जेवण आठवडय़ात तीन ते चार दिवस न घेणे, ६ टक्के  डॉक्टर आठवडय़ात तीन ते चार दिवस रात्रीचे जेवण घेत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे काही जण भूक लागल्यास मिळेल ते खाद्यपदार्थ खाऊन वेळ काढत असल्याचेही अभ्यासात पुढे आले.

फास्ट फूड खाणारे सर्वाधिक

निवासी डॉक्टरांपैकी ७८ टक्के डॉक्टर फास्ट फूडचे सेवन करत होते. ७१ टक्के जण मांसाहार आणि शाकाहार असे दोन्हीचे सेवन करत होते. २८ टक्के डॉक्टर केवळ शाकाहार जेवण करत असल्याचे पुढे आले.

मेडिकलच्या अभ्यासात निवासी डॉक्टरांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण जास्त आढळले आहे. त्यांना वेळेवर जेवणासह व्यायाम करण्याचा सल्ला वेळोवेळी दिला जातो. या डॉक्टरांच्या खेळण्यासाठी येथे अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या जात असून त्यांचे समुपदेशनही केले जाते.’’ – डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता.