19 February 2020

News Flash

दोन बहिणींची झोपडी तोडून भूखंड बळकावला

बिल्डरने साथीदारांच्या मदतीने चक्क झोपडीवर जेसीबी चालवून भूखंड बळकावल्याचा धक्कादायक प्रकार शताब्दीनगर परिसरात गुरुवारी समोर आला.

संग्रहित छायाचित्र

शहरात भूखंड माफियांच्या दादागिरीचा कळस

स्वत:च्या एका भूखंडावरील झोपडय़ात दोन बहिणींचे वास्तव्य असताना बिल्डरने साथीदारांच्या मदतीने चक्क झोपडीवर जेसीबी चालवून भूखंड बळकावल्याचा धक्कादायक प्रकार शताब्दीनगर परिसरात गुरुवारी समोर आला. या घटनेमुळे शहरात भूखंड माफियांच्या दादागिरीने कळस गाठल्याचे दिसते. अशाप्रकारे निर्ढावलेल्या भूखंड माफियांची नांगी ठेचून काढण्याची मागणी होत असून अजनी पोलिसांनी दरोडा टाकण्याचा गुन्हा दाखल करून बिल्डरसह तिघांना अटक केली आहे.

बांधकाम व्यवसायी विजय बागडे, श्रीकृष्ण यादव, किशोरसिंग बैस, राजू साळवे आणि मनीष यांच्यासह ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी विजय, श्रीकृष्ण आणि मनीष यांना अटक करण्यात आली आहे. विजय बागडे याची शिवम बिल्डर नावाची कंपनी आहे. अनेक वर्षांपासून त्याचा डोळा शताब्दीनगर परिसरातील रहिवासी रक्षंदा बबनराव नारनवरे (२१) आणि लक्ष्मी नारनवरे यांच्या घरावर होता. त्यांचा मोठा भूखंड असून त्या ठिकाणी एका झोपडीत दोघीही बहिणी राहात होत्या. त्यांचे वडील एचडीएफसी बँकेत सुरक्षारक्षक आहेत. दोघ्याही बहिणींचे झोपडे असलेल्या या भूखंडावर आरोपींची वक्रदृष्टी पडली. त्यांनी आधी त्या भूखंडावर मालकी हक्क सांगितला. पण, तरुणींनी हा भूखंड आपल्या आजोबाच्या नावावर असल्याचे दस्तावेज सादर केले. भूखंडासंदर्भात प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. हे प्रकरण १९७१ पासून सुरू आहे. बुधवारी मुली रामेश्वरी परिसरात राहणाऱ्या आजीकडे गेल्या होत्या. दुपारच्या सुमारास झोपडीत कुणीच नसल्याचे बघून आरोपींनी काही कामगार व जेसीबी घेऊन झोपडे तोडले व त्या ठिकाणी शिवम बिल्डरच्या नावाने फलक लावला. याबाबत माहिती मिळताच लक्ष्मी नारनवरे घरी पोहोचली असता आरोपींनी तिला मारहाण केली. झोपडीतील सामानही ट्रकमध्ये टाकून लुटून नेले. तसेच शेजारी राहणाऱ्या संगीता उपाध्याय यांच्या रिकाम्या भूखंडावरील टिनाचे कुंपणही तोडले. रक्षंदा नारनवरे यांच्या तक्रोरीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करीत कारवाई केली.

आरोपी अजनी पोलिसांच्या संपर्कात…

भूखंड तोडण्यास जाण्यापूर्वी बिल्डर हा अजनी पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होता. झोपडे तोडून त्या ठिकाणी आपले फलक लावेपर्यंत पोलीस पोहोचू नयेत, अशी माहिती देण्यात आली होती. भूखंडावरील झोपडे तोडून झाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. एकप्रकारे पोलिसांनी झोपडे तोडण्यासाठी बिल्डरांशी संगनमत केले होते, असा आरोप होत आहे.

First Published on September 6, 2019 3:55 am

Web Title: forced by force plot builder akp 94
Next Stories
1 सातव्या वेतन आयोगाची थकबाकी केव्हा देणार?
2 धक्कादायक! नागपूरमध्ये पोलिसांकडून लाच म्हणून वेश्यांची मागणी
3 पंतप्रधान येती घरा.. यंत्रणा लागली कामाला!
Just Now!
X