कार्यकारिणी गठनाची प्रक्रिया अधांतरी; जैवविविधता दिवस विशेष

नागपूर : राज्यात नवे सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण याच सरकारमधील वनखात्याच्या मंत्र्यांना अजूनही त्यांच्या कार्याची ओळख झालेली नाही. जैवविविधता मंडळाचे अध्यक्षपद गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहे, याची साधी माहिती वनमंत्र्यांना नाही. त्यामुळेच मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपून काही महिने झाले, पण अजूनही नवीन कार्यकारिणीच्या गठनाची प्रक्रि या अधांतरी लटकली आहे. उद्या २२ मे रोजी जैवविविधता दिवस साजरा के ला जात असताना, राज्यातील मंडळाला कुणी वालीच उरला नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

राज्यातल्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्र जैवविविधता मंडळ स्थापन झाले. या आठ वर्षांतील मंडळाच्या एकू च कार्याचा आढावा घेतल्यानंतर हे मंडळ नेमके  कशासाठी स्थापन झाले, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही. मंडळाचे पहिले अध्यक्ष इरॉक भरुचा यांनी मंडळाचे मुख्यालय नागपुरात असताना पुण्यातच ठाण मांडले. त्यानंतर डॉ. विलास बर्डेकर यांच्या हाती मंडळाची धुरा आली, पण त्यांनीही भरुचा यांचाच कित्ता गिरवला. पहिल्या अध्यक्षाने मंडळाचा आराखडा तयार करण्यातच त्यांची कारकीर्द खर्ची घातली. दुसऱ्या अध्यक्षाने फु लपाखरांच्या नामकरणावर समाधान मानले. त्यामुळे बर्डेकरांच्या कार्यकाळात ‘फु लपाखरांचे मंडळ’ अशीच मंडळाची ओळख तयार झाली. नागपुरातील मंडळाचे मुख्यालय म्हणजे फक्त नावापुरते ठरले. कारण मुख्यालयात गेल्यानंतर अध्यक्षांच्या कक्षाला कायम कु लूप लागलेले असते. राज्यात जिल्हा परिषद, महापालिका, ग्रामपंचायत अशा सुमारे २९ हजार स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यांच्याशी मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी किती संवाद साधला, तर याचे उत्तरही नकारात्मक आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जैवविविधतेच्या संवर्धनाच्या उद्देशाने मंडळ स्थापन झाले, पण गेल्या आठ वर्षांत जैवविविधतेची स्थिती सुधारली नाहीच आणि मंडळ स्थापनेच्या उद्देशाला मात्र हरताळ फासला गेला. ३० जानेवारीला मंडळाचे अध्यक्षपद आणि अशासकीय सदस्यांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पदांसाठी अर्ज  दाखल करण्याची अंतिम तारीख १३ मार्च होती. त्यालाही आता अडीच महिने उलटून गेले, पण अजूनपर्यंत वनखात्याला आणि या खात्याच्या मंत्र्यांना मंडळाची नवीन कार्यकारिणी गठित करता आली नाही.

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या नवीन कार्यकारिणी गठनाचा प्रस्ताव माझ्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाही. हा प्रस्ताव पुण्यावरून की नागपूरवरून पाठवण्यात आला, तो कधी पाठवण्यात आला याची माहिती मी घेतो.

– संजय राठोड, वनमंत्री