* दोन अत्यवस्थ, संतप्त जमावाने बस पेटवली * माळेगावच्या रुग्णांना नागपुरात हलवले

नागपूर-सावनेर महामार्गावरील माळेगाव येथे शनिवारी रात्री ८.३० ते ९ वाजताच्या दरम्यान एका ऑटोरिक्षाला खासगी बसने जोरदार धडक मारली. त्यात ऑटोतील चारजण जागीच ठार झाले असून तीन अत्यवस्थ रुग्णांना नागपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, गावातील संतप्त जमावाने ही बस पेटवल्यामुळे रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता.

उमेश विनायक दहीकर (३६), कमला पालेकर (८४), गजानन चांदूरकर (४०), अर्चना पालेकर (३५) चौघेही राहणार माळेगाव अशी जागीच मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. राजू पालेकर (३०), पारस पालेकर (७) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. ऑटोरिक्षाचालक गजानन चांदूरकर हा सहा प्रवाशांना घेऊन सावनेरवरून माळेगावला जात होता. एका वळणावर त्याने ऑटोरिक्षा नागपूर-सावनेर राष्ट्रीय महामार्गावर वळवला. याप्रसंगी छिंदवाडावरून नागपूरकडे येणाऱ्या भरधाव खासगी बसची त्याला जोरदार धडक लागली. अपघातात ऑटोरिक्षा अनेक फूट ऊडून त्यातील तिघांचा जागीच मृत्यू तर इतर चौघे गंभीर जखमी झाले. त्यातील एकाचा मेडिकलला पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला.

परिसरातील नागरिकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवले. मध्यप्रदेशमधील बस चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचे बघत संतप्त जमावाने बसची जाळपोळ केली. बसमधील प्रवासी खाली उतरल्याने ते बचावले. अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, सावनेर पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेऊन बंदोबस्त वाढवल्यामुळे अनुचित प्रकार टळला.

पालेकर कुटुंबावर शोककळा

नागपूर-सावनेर महामार्गावरील अपघातात पालेकर या एकाच कुटुंबातील दोघांचा मृत्यू तर दोघे अत्यवस्थ असल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. तेव्हा त्यांनी घटनास्थळासह नागपूरच्या रुग्णालयात धाव घेतली. याप्रसंगी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.