केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने महापालिकेचा उपक्रम

 

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या सहकार्याने नि:शुल्क ऑनलाईन वैद्यकीय उपचार सुरू करण्याचा संकल्प के ला आहे. या सामाजिक उपक्रमांतर्गत गरजू रुग्णांना नि:शुल्क ऑनलाईन वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत.

करोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. वैद्यकीय व्यवस्था कोलमडली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची खूप परवड होत आहे. सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळवताना प्रचंड  त्रास होतो आहे. तसेच सर्दी, खोकला ताप या आणि आरोग्याच्या इतर सामान्य तक्रारी असलेल्या नागरिकांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नाही.

ज्या रुग्णांना प्रत्यक्ष डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्याची गरज नाही किंवा ज्यांना आरोग्याबाबत सामान्य तक्रारी आहेत, अशा रुग्णांना या सेवेचा लाभ घेता येईल. या सेवाभावी कार्यात शहरातील अनेक डॉक्टर्स सहभागी होत आहेत.  करोनामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहे, आज एकमेकांना सांभाळून घेण्याची गरज आहे, एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याची गरज आहे. अशा काळात हा उपक्रम सामान्य नागपूरकरांना दिलासा देणारा ठरणार आहे. या सामाजिक कार्यात समाजातील विविध घटकांनी, डॉक्टरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन गडकरी, महापौर दयाशंकर तिवारी आणि नागपूर महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.