गडचिरोलीतील १० पोलिसांना शौर्यपदक, पोलीस अधिकारी दांगट यांना विशेष पदक
जीवाची बाजी लावून नक्षलवाद्यांविरोधात लढणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलिस दलातील शूर १० जिगरबाजांना पोलीस शौर्यपदक, तर सहाय्यक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांना पोलिस दलात दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेकरिता पोलिस मेडल फॉर मेरिटोरिअस पदक जाहीर झाले आहे. दरम्यान, नागपूरचे पोलीस उपायुक्त रविंद्रसिंग परदेशी आणि राज्य राखीव दलाचे असिस्टंट कमांडंट श्रीधर खंडारे यांना राष्ट्रपती पोलीसपदक जाहीर झाले आहे. तसेच विदर्भात चार वर्षे सेवा दिलेल्या व सध्या ताडदेव आम्र्स फोर्स मुख्यालयाचे उपायुक्त असलेले श्रीप्रकास वाघमारे यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ात पोलिस शौर्यपदक जाहीर झालेल्यांमध्ये सहायक पोलिस निरीक्षक अतुल छावण तवाडे, पोलिस नाईक शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, प्रवीण हंसराज भसारकर, बाबूराव महारू पदा, विनोद मेस्सो हिचामी, बस्तर लक्ष्मण मडावी, दिलीप ऋषी पोरेटी, दिनकरशहा बालसिंग कोरेटी, देवनाथ खुशल काटेंगे व संजय लेंगाजी उसेंडी या १० जणांचा समावेश आहे. १७ ऑक्टोबर २०१३ रोजी एटापल्ली तालुक्यातील कसूरवाही, पेंदूलवाही, गोटीनवडा जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यास पोलिसांनी अत्यंत धर्याने प्रत्युत्तर दिले होते. या वेळी पोलिसांनी एक नक्षल मृतदेहासह बंदूक, काडतुसे व इतर साहित्य जप्त केले. यावेळी जीवाची पर्वा न करता सहायक पोलिस निरीक्षक अतुल छावण तवाडे, पोलिस नाईक शिपाई इंदरशहा वासुदेव सडमेक, पोलिस नाईक शिपाई प्रवीण हंसराज भसारकर, पोलिस नाईक शिपाई बाबूराव महारू पदा, पोलिस नाईक शिपाई विनोद मेस्सो हिचामी या पाच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करून नक्षलवाद्याला कंठस्नान घालून जळून जाण्यास भाग पाडले. तसेच खोब्रामेंढा जंगलात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंदाधुद गोळीबार केला. यानंतर पोलिसांनीही तितक्याच जोरदार सामना केला होता. ही चकमक अर्धा तास चालली. त्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगल व पहाडीचा फायदा घेऊन पळून गेले. यात पोलिसांना दोन नक्षल मृतदेहांसह १ रायफल व इतर साहित्य जप्त केले होते. या चकमकीत पोलिस हवालदार बस्तर लक्ष्मण मडावी, पोलिस नाईक दिलीप ऋषी पोरेटी, पोलिस नाईक दिनकरशहा बालसिंग कोरेटी, पोलिस नाईक देवनाथ खुशल काटेंगे व पोलिस नाईक संजय लेंगाजी उसेंडी यांनी अतुलनीय शौर्य दाखविले. या दहा लढवय्यांच्या कार्यासाठी त्यांना केंद्र सरकारतर्फे पोलीस शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. तसेच पोलिस अधीक्षक कार्यालयातील सहाय्यक फौजदार अनिल मधुकरराव दांगट यांनी पोलीस दलात दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेकरिता त्यांना पी.एम.एम.एस. हे पदक मंजूर झाले आहे. उद्या, स्वातंत्र्याच्या ६९ व्या वर्धापन दिनानिमित्त या सर्व लढवय्या शुरवीरांचा पोलिस शौर्यपदक देऊन गौरव करण्यात येणार आहे.
दरम्यान, रविंद्रसिंग संतोषसिंग परदेशी हे सध्या नागपूर पोलीस दलात परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त आहेत, तर श्रीधर गोपाळराव खंडारे नागपुरातील राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक चारचे असिस्टंट कमांडंट आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांची नावे रविवारी पोलीस महासंचालकांच्या वतीने संकेतस्थळावर जाहीर झाले. पोलीस दलातील विशेष कामगिरी आणि गुणवत्तापूर्ण सेवा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले जाते. रविंद्रसिंग परदेशी हे मूळचे जळगाव जिल्ह्य़ातील बांभरूड या खेडेगावातील आहेत. मराठवाडा विद्यापीठातून वाणिज्य शाखेचे ते पदवीधर आहेत. त्यानंतर एमपीएससी परीक्षा देऊन पोलीस उपनिरीक्षक म्हणून १९९३ मध्ये पोलीस दलात रुजू झाले. त्यांची पहिलीच नियुक्ती नागपुरातील सोनेगाव पोलीस ठाण्यात झाली होती. सात वर्षे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा दिल्यावर त्यांनी पुन्हा एमपीएससीची परीक्षा दिली. त्यात उत्तीर्ण होऊन ते पोलीस उपअधीक्षक झाले. प्रोबेशनरी म्हणून चंद्रपूरला सेवा दिली. त्यानंतर २००५ ते ०८ पर्यंत कुरखेडा येथे पोलीस उपविभागीय अधिकारी, तर २००८ ते २००१० पर्यंत पुणे (ग्रामीण) हवेली येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून उस्मानाबाद, बारामती येथे काम केले. २०१२ ते २०१५ दरम्यान नवी मुंबईत राज्य राखीव दलाचे कमांडंट ही जवाबदारीही त्यांनी सांभाळली. गेल्या काही महिन्यापूर्वीच ते नागपूर पोलीस दलात झोन- २ उपायुक्तपदी रुजू झाले.