पावसाच्या हजेरीतही उत्साह कायम 

गणरायाच्या आगमनाला हजेरी लावल्यानंतर विसर्जनालाही बरसलेल्या पावसाचा कुठलाही परिणाम विसर्जनाच्या मिरवणुकीवर झाला नाही. दिवसभर अतिशय उत्साहात मंगळवारी बाप्पाला वाजत गाजत निरोप देण्यात आला.

शहरातील सोनेगाव आणि सक्करदरा तलावावर विसर्जनाला बंदी घातली होती.तलावाच्या परिसरात कृत्रिम  तलावात बाप्पाचे विसर्जन केले. सजवलेल्या हातगाडय़ांवर, मारुती व्हॅन, जीप आदी वाहनांवर श्री मूर्ती ठेवून तसेच श्रींसमोर ढोल ताशे, बेंजो या वाद्याचा गजरामुळे सार्वजनिक व घरगुती श्री विसर्जनाला मिरवणुकीचे स्वरूप आले होते. तरुणी, महिला आणि युवक बेधुंद होऊन नाचत होते.

‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजराने फुटाळा, सोनेगाव व शुक्रवार तलावाच्या काठचा परिसर निनादून गेला होता. भोसलेकालीन मानाचा असलेला गांडल्याचा गणपती, तुळशीबागमधील नागपूरचा राजा, दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती, महालचा राजासह गोकुळपेठ, रेशीमबाग, नंदनवन, धरमपेठ, सीताबर्डी, लक्ष्मीनगर या भागातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले. नागपूरच्या राजाची थाटात सकाळी ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

कृत्रिम तलावांना नागरिकांचा प्रतिसाद

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध भागात आणि तलावाच्या ठिकाणी २१० कृत्रिम तलाव करण्यात आले आहे. त्यात ६५ कुंड सेंट्रिंगचे, ११० कुंड रबरचे आणि जमिनीत खड्डे तयार करून ३६ विसर्जन कुंड तयार करण्यात आले होते, तर पाच विसर्जन कुंड स्थायी स्वरूपाचे करण्यात आले. या स्थायी विसर्जन कुंडात विसर्जन करून जनतेने चांगला प्रतिसाद दिला.

विसर्जनादरम्यान मुलाचा मृत्यू

गणपती विजर्सनासाठी निघालेल्या मिरवणुकीत डीजेच्या तारेतून विजेचा धक्का लागल्याने एका तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्यांतर्गत उमरी या गावात घडली. क्रिष्णा प्रेम आडे असे मृत मुलाचे नाव आहे. गावामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या गणपती विसर्जनाकरिता सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. त्यावेळी ट्रॅक्टरवर गणपती ठेवण्यात आला. त्यानंतर गावातील तरुण मुले-मुली डीजेच्या तालावर मिरवणुकीत नाचू लागले. दरम्यान, डीजेच्या तारेतून विजेचा प्रवाह सुरू असल्याने क्रिष्णाला जोरदार धक्का लागला. याची माहिती त्याच्या आजोबाला देण्यात आली. त्याला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्यामुळे गावावर एकच शोककळा पसरली आणि या घटनेमुळे गणपती विसर्जनाला गालबोट लागले.