आलिशान बंगल्यावर बुलडोझरची धडक; पोलीस बंदोबस्तात महापालिकेची कारवाई

नागपूर : कुख्यात गुंड संतोष आंबेकर इतवारी परिसरातील ज्या आपल्या आलिशान बंगल्यात बसून गुन्हेगारी कृत्यांचे नियोजन करायचा त्या दोन मजली आलिशान बंगल्यावर आज मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केली.

आंबेकरच्या या आलिशान बंगल्यावर कारवाई केव्हा होणार, याकडे सर्वाचे लक्ष होते. इतवारी परिसरातील हा प्रशस्त आणि जयपुरी गुलाबी दगडाने सजवलेला बंगला कोटय़वधी रुपयांचा आहे. या बंगल्याचे बांधकाम अनधिकृत असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. शिवाय हा  बंगला झोपडपट्टी परिसरात मोडत असून डिसेंबर महिन्यात आंबेकरला नोटीस देण्यात आली होती. या नोटीशीला त्याने आव्हान दिले होते. मात्र त्याचे अपील फेटाळ्यात आले होते. त्यानंतर दोन महिन्यापासून कारवाईची प्रतीक्षा होती. अखेर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर महापालिकेचे विरोधी अतिक्रमण पथक दोन जेसीबी आणि पोकलॅनसह आंबेकरच्या बंगल्यावर धडकले. तत्पूर्वी बंगल्याकडील सर्व मार्ग बंद करण्यात आले होते.

बंगल्यात राहणारे त्याचे कुटुंब दोन महिन्यापूर्वीच दुसरीकडे राहण्यास गेले होते. सध्या तेथे कोणीच राहत नव्हते. कारवाई सुरू होताच बंगल्याचा समोरचा भाग जेसीबीने पडत नसल्यामुळे अखेर पोकलॅन यंत्र बोलावण्यात आले.

त्याच्या सहाय्याने बंगला पाडण्याची कारवाई सुरू झाली. सायंकाळपर्यंत ही कारवाई सुरू होती. महापालिकेचे अतिक्रमण विरोधी विभाग प्रमुख अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनात उद्या बुधवारी ही कारवाई सुरू राहणार आहे.

तीन भूखंडांवर अनधिकृत बांधकाम

आंबेकरने तीन भूखंड जोडून मोठा आलिशान बंगला बांधला होता. त्याचा एक भूखंड नेहा संतोष आंबेकरच्या नावावर होता. त्याचे ६०.१५ चौरस मीटर बांधकाम अनधिकृत होते. दुसरा भूखंड अमरचंद मदनलाल मेहता यांच्या नावे होता. त्यावर त्याने ७२१.५६ चौरस मीटरचे अनधिकृत बांधकाम केले होते. तिसरा भूखंड आंबेकरच्या स्वत:च्या नावावर होता. त्याचे २१.३० चौरस मीटर बांधकाम अनधिकृत होते. या तिन्ही भूखंडावर ८०३ चौरस मीटर (८६४०.२८ चौरस फूट) बांधकाम हे अनधिकृत होते.

आयुक्तांनी निर्देश दिले अन् यंत्रणा हलली

विदर्भाचा डॉन म्हणून कुख्यात असलेला संतोष आंबेकरने गेल्या अनेक वर्षांपासून अवैध धंद्यातून कोटय़वधींची संपत्ती गोळा केली आहे. याच बंगल्यातून त्याच्या काळ्या धंद्याच्या साम्राज्याची सूत्रे तो हलवत होता. गेल्यावर्षीच्या ऑक्टोबरपासून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळणे सुरू केले होते.  १२ ऑक्टोबरला त्याला अटक केली. तेव्हापासून त्याच्या विरोधात आतापर्यंत मारहाण, खंडणी, बलात्कार, लुबाडणूक असे वेगवेगळे १८ प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई करत त्याचे साम्राज्य उद्ध्वस्त करणे सुरू केले होते. तेव्हापासून त्याचे अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र, महापालिका निर्णय घेत नव्हती. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्याच्या संपत्तीची माहिती घेत अनेक आठवडे अडकलेली कारवाई लगेच करण्याचे आदेश दिले आणि अनधिकृत बंगला पाडण्यास सुरुवात झाली.

यासंदर्भात आंबेकरला डिसेंबरमध्ये नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर त्याने महापालिकेत अपील केले होते. मात्र ते खारीज करण्यात आले.  आता महापालिकेने बंगल्यातील अनधिकृत बाधकामावर कारवाई सुरू केली आहे. पाच भूखंडावर हे बांधकाम करण्यात आले आहे. ही जमीन आंबेकरच्या नावावर असली तरी नकाशा मंजूर न करता बांधकाम केले आहे. त्यामुळे ही कारवाई सुरू करण्यात आली.

– अशोक पाटील, सहायक आयुक्त (अतिक्रमण विभाग)