भांडेवाडी संकलन केंद्रात आकस्मिक भेट; कर्मचाऱ्यांची तारांबळ

नागपूर : भांडेवाडी येथील कचरा संकलन केंद्र (डंपिंग यार्ड)ला महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज बुधवारी सकाळी आकस्मिक भेट दिली. यावेळी  कचरा व्यवस्थापनातील हलगर्जी बघून आयुक्त जाम संतापले. त्यांनी कठोर शब्दात अधिकाऱ्यांना धारेवर धरले. आयुक्तांच्या या अचानक भेटीमुळे अधिकारी व आणि तेथील कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

मुंढे यांनी यांच्या जनता दरबारात भांडेवाडी डम्पिंग यार्डबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. शिवाय कचरा संकलन करणाऱ्या नवीन दोन कंपन्यांबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर मुंढे थेट भांडेवाडीत पोहोचले. येथे कचरा मोजला जातो त्या वजन काटय़ाच्या ठिकाणी जाऊन तपासणी केली. त्यानंतर मुंढे यांनी त्यांची गाडी थेट कचऱ्याच्या डोंगरावर चढवली. तेथून त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करतानाच अधिकाऱ्यांकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. अधिकाऱ्यांकडून देण्यात येत असलेली माहिती आणि प्रत्यक्षात दिसत असलेले चित्र यातील तफावत लक्षात येताच मुंढे यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सभोवतालच्या कचऱ्यात त्यांना प्लास्टिक दिसले. शहरात सिंगल युज प्लास्टिकवर बंदी असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात प्लास्टिक कसे काय आले, अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली. मात्र या प्रश्नावर अधिकाऱ्यांना कोणतेही उत्तर देता आले नाही. नवीन दोन कंपन्यांच्या कामाबाबतची माहिती घेत दररोज किती टन कचरा साठवला जातो आणि किती कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, याची माहिती मागितली. मात्र संबंधित अधिकाऱ्यांकडे त्याबाबत माहितीच नव्हती. कचरा संकलन करणाऱ्या कंपन्यांना जनतेच्या करातून पैसे दिले जातात. त्यामुळे या कामात कुठलाही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आयुक्तांनी दिला.

शहरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते हे पाहण्यासाठी भांडेवाडीत गेलो. या ठिकाणी  कचऱ्याचे विलगीकरण योग्य पद्धतीने होत नाही. ४०  टक्केच सध्या काम होत आहे ते १०० टक्के होणे गरजेचे आहे. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा. याबाबत अंमलबजावणी झाली नाही तर येत्या आठ दिवसानंतर दंडात्मक कारवाई करून तीनशे रुपयापासून ते १ हजार रुपयापर्यंत दंड आकारण्यात येईल.   – तुकाराम मुंढे,आयुक्त, महापालिका.