राम भाकरे

शहरातील अनेक कुंडय़ांमध्ये तुडुंब कचरा; स्वच्छता सर्वेक्षणातील घसरणीला हातभार

महापालिकेने शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प केला. त्यासाठी प्रत्यक्ष कचरा संकलित करणारी यंत्रणा राबवून शहरातील ७०० कचराकुंडय़ांपैकी ५०० काढल्या. पण, तरीही  शहरातील अनेक कुंडय़ांमध्ये तुडुंब कचरा भरलेला दिसत असून कचराकुंडीमुक्त शहराची परिकल्पना सध्यातरी कागदावरच आहे.

केंद्र शासनाच्या सव्‍‌र्हेक्षणात शहराचा क्रमांक ५३ वरून ५५ व्या स्थानावर गेला आहे. तो तसा जाण्याला या कुंडय़ांचा मोठा हातभार लागला आहे. हे काम खासगी कंपनीकडे देण्यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने ते केले जात होते. मात्र  जुलै २००९ मध्ये महापालिकेने कचरा संकलन व प्रक्रियेचे खासगीकरण केले आणि कनक र्सिोसेस या कंपनीकडे काम दिले. सुरुवातीच्या काळात कचऱ्याची उचल करण्यासाठी बॅग देण्यात आल्या. विविध प्रभागांमध्ये घंटागाडय़ा फिरवण्यात आल्या. त्यानंतर

कचराकुंडीमुक्त योजना प्रकल्पांतर्गत कचऱ्याची उचल करून तो साठवण्यासाठी शहरातील विविध भागात प्लास्टिकचे दोन डबे लावण्यात आले. शहरातील विविध भागात असे ७०० पेक्षा अधिक डबे लावण्यात आले. मात्र, गेल्या वर्षभरात त्यातील अनेक डबे तुटून पडले आहेत, तर काही चोरीला गेले. शहरातील अनेक भागात घराघरातून कचरा उचलला जात असल्याचा दावा केला जात असला तरी वास्तविकता तशी नाही. आजही अनेकांच्या घरी कचरा उचलायला कुणीच जात नाही. प्रभागातीलच एका भागात कचरा साठवून ठेवला जातो.

पूर्वी महापालिकेच्या सायकल असलेल्या गाडय़ा जवळजवळ प्रत्येक दिवशी कचरा गोळा करण्यासाठी येत. मात्र कालातंराने इंधनावर चालणारी कचरा संकलक वाहने आल्यानंतर तीनचाकी सायकली बंद झाल्या. भांडेवाडीमध्ये कचरा साठवला जात असल्याचे कंपनीकडून सांगितले जात असले तरी अनेक सफाई कर्मचाऱ्यांकडून निरुपयोगी कचरा मोकळी जागा पाहून शहरातच टाकला जातो.

हे करायला हवे

* कचरा विलगीकरण

* ट्रान्सफर स्टेशनद्वारे कचरा संकलन

* नागरिकांमध्ये जनजागृती

* कचरा उचलण्यासाठी कंटेनरयुक्त हातगाडय़ा

* हाइड्रोलिक ऑटोमोबाईल वाहने

* कॉम्पॅक्टर आणि हूक लोडर वाहने

* घरगुती कचरा व्यवस्थापन

शहर कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्यावतीने विविध योजना राबवल्या जात आहेत. कचरा संकलन करण्यासाठी घरोघरी डबे देण्यात आले. त्यानंतर प्रत्येक भागात डबे लावण्यात आले. नागरिकांकडून सहकार्य मिळाले तर शहर कचराकुंडीमुक्त होण्यास काही अडचण नाही. प्रशासनातील अधिकारी प्रयत्न करीत आहेत. मात्र नागरिकांमध्ये जागरूकतेची गरज आहे.

– डॉ. सुनील कांबळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता)