क्ष-किरण, रक्ताच्या तपासण्या ठप्प; डागा, मेडिकल, मेयोतील शस्त्रक्रिया स्थगित

उपराजधानीतील मेडिकल, मेयो, डागा, सुपरस्पेशालिटी, मनोरुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सात हजार कर्मचारी विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संपावर गेल्याने सर्व ठिकाणची प्रशासकीय व रुग्णालयीन व्यवस्था बुधवारी जास्तच कोलमडली. येथील ५० वर शस्त्रक्रिया स्थगित करण्यात आल्या. रुग्णांच्या क्ष-किरण, रक्तासह इतर तपासण्या आणि विविध वार्डात औषधांचा पुरवठा बंद पडल्याने रुग्णांचा जीवच मेटाकुटीस आला.

सातव्या वेतन आयोगासह इतर मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात आरोग्य विभागासह वैद्यकीय शिक्षण खात्याच्या ९५ टक्केहून जास्त तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाल्याने रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत. मेयो, मेडिकल, सुपर, डागा, आयुर्वेद, मनोरुग्णालयातील सर्वच प्रकारच्या तपासण्या खोळंबल्या आहेत. आजाराचे निदानच होत नसल्याने उपचार करण्याबाबत डॉक्टरांना अडचणी येत आहेत. मेडिकलमधील कर्करुग्णांना लाईट देण्यासह ब्रेकोथेरपी उपकरणावरील उपचार बंद झाल्याने रुग्णांच्या वेदना वाढल्या आहेत. त्यातच सर्वच रुग्णालयांतील सिटीस्कॅन, एमआरआय, एक्स-रे सारख्या चाचण्या बंद पडल्या आहेत. संपामुळे शस्त्रक्रिया गृह आणि तेथील रुग्णांच्या रक्ताने माखलेल्या कापडांचे र्निजतुकीकरण ठप्प आहे. परिणामी, रुग्णालयातील सुमारे ५० शस्त्रक्रिया स्थगित झाल्या आहेत.

मेडिकलकडून मात्र संपामुळे शस्त्रक्रिया स्थगित झाल्या नसून अत्यावश्यक शस्त्रक्रिया वेळेवर आल्याने इतर शस्त्रक्रिया स्थगित झाल्याचे सांगण्यात आले. संपामुळे रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून सर्व रुग्णालयांत वरिष्ठ अधिकाऱ्यांना रुग्णांच्या उपचारासह विविध तपासणीसाठी प्रशासनाने कामावर लावले आहे. त्यांच्या मदतीसाठी परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. शस्त्रक्रिया गृहातही प्रशासनाने जास्तीत जास्त शस्त्रक्रिया करण्याबाबत सूचना करत बाह्य़स्रोतांकडून घेतलेले कर्मचारी वाढवून घेतले आहेत.

आकडे काय सांगतात?

मेडिकलमध्ये  रोज किमान २५ सिटीस्कॅन, आणि २५ एमआरआय तपासण्या होतात, परंतु संपामुळे सर्व तपासण्या खोळंबल्या आहेत, परंतु प्रशासनाकडून पाच तपासण्या झाल्याचा दावा केला जात आहे. काही डॉक्टरांच्या मदतीने सोनोग्राफी सुरू आहे, परंतु त्याचीही संख्या फार कमी आहे.

डागातील रुग्ण घेण्यास मेडिकलचा नकार

डागात रोज ४० प्रसूती होतात, परंतु येथील ९९ परिचारिकांसह सर्व तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी संपात सहभागी झाल्याने येथील प्रसूतींची संख्या २५ ते ३० टक्क्यांनी खाली आली आहे. डागा रुग्णालयात जोखिमेच्या महिलांवर प्रसूतीची व्यवस्था नाही. त्यामुळे येथील रुग्ण मेडिकलला पाठवले जातात, परंतु मेडिकलने संपामुळे  प्रसूती रुग्णांना न पाठवण्याच्या सूचना केल्यामुळे महिलांचा जीव धोक्यात आला आहे.