मेडिकलच्या परिचारिका दाखवल्या चंद्रपूरला

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातून (मेडिकल) चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उसनवारीवर २८ डिसेंबर २०१७ रोजी भारतीय वैद्यक परिषदेच्या (एमसीआय) दौऱ्यासाठी वीसपेक्षा जास्त परिचारिका पाठवून त्या तेथेच कार्यरत असल्याचे दाखवण्यात आले आहे. वैद्यकीय संस्थेतील शिक्षकांना इतर संस्थेत कार्यरत असल्याचे नियमबाह्य़ दाखवले जाते. आता त्यात परिचारिकांचीही भर पडली आहे.

भारतातील प्रत्येक शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना एमसीआयच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. महाविद्यालयांना मंजूर पदवी व पदव्युत्तरच्या जागांच्या (विद्यार्थी संख्या) प्रमाणात संस्थेने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, अधिव्याख्यात्यांसह इतर सर्वच संवर्गातील पदे भरणे आवश्यक आहे. एमसीआयच्या निरीक्षणात ही पदे रिक्त असल्याचे आढळून आल्यास संबंधित संस्थेतील पदवी-पदव्युत्तरच्या जागा कमी करण्याचे अधिकार एमसीआयला आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत निदान या नियमांचे पालन होणे आवश्यक असताना नागपूरच्या मेयोसह इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत आजही शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. ही बाब पुढे येऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभाग एमसीआयच्या दौऱ्यादरम्यान एका संस्थेतील शिक्षकांना इतर संस्थेत कार्यरत असल्याचे दर्शवते. शिक्षकांची ही पळवा-पळवी सर्वश्रूत असतांनाच चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २८ डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या एमसीआय चमूच्या निरीक्षण दौऱ्याच्या वेळी शिक्षकांसोबतच नागपूरहून वीसहून अधिक परिचारिकाही तेथे पाठवण्यात आल्या होत्या.

परिचारिकांची पदे रिक्त

चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १९८ परिचारिकांची पदे मंजूर आहेत, परंतु सध्या तेथे १०० सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परिचारिका प्रतिनियुक्तीवर आहेत. ३५ परिचारिका वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून निश्चित कालावधीनंतर परिचारिका काढून घेण्यात येणार आहेत.

वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत शिक्षकांची सर्वच पदे भरली असून परिचारिकांची काही पदे रिक्त आहेत. त्यापैकी ५० जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. एमसीआय चमूच्या दौऱ्यादरम्यान काही परिचारिका नागपूरहून आणण्यात आल्या होत्या. पदभरतीनंतर त्रुटी दूर होईल. एमसीआयचे पथक सकारात्मक असल्याने येथील जागांवर काहीही परिणाम पडणार नाही

 – सत्यवान मोरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर</strong>