स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली; वनविभागाला मागितला अहवाल

नागपूर : अंबाझरी राखीव वनक्षेत्रात लागलेल्या आगीच्या घटनेची उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गांभीर्याने दाखल घेऊन स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. या याचिकेवर मंगळवारी न्या. रवि देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने शहरातील जंगलात आग लागणार नाही, यासंदर्भात काय उपाययोजना करता येईल, अशी विचारणा केली असून दोन आठवडय़ात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

प्रादेशिक वनखात्याच्या अखत्यारितील सुमारे ७५० हेक्टरचा हा परिसर आहे. अंबाझरी परिसरात पक्ष्यांच्या शेकडो प्रजाती, हरिण, रानडुक्कर यासारख्या वन्यप्राण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात आहे. २६ मे रोजी रात्री बारा वाजताच्या सुमारास हा परिसर आगीच्या विळख्यात सापडला. या परिसरातील इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणारे किरण भोंडे पाटील यांना ही आग दिसताच ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, अग्निशमन विभागाची दोन वाहने याठिकाणी पोहोचली होती. मात्र, चारही बाजूने हा परिसर बंदिस्त असल्याने आणि प्रवेशाचे मोजकेच मार्ग असल्याने या वाहनांना आत जाता आले नाही. भोंडे यांनी त्यांना मार्ग दाखवला आणि ही वाहने आत गेली. तोपर्यंत आगीने बराच मोठा परिसर व्यापला होता. त्यांनी वनखाते, पोलीस खाते या सर्वाना घटनेची माहिती दिली. यादरम्यान अग्निशमन विभागाची आणखी चार वाहने याठिकाणी आली. या परिसरात गवत मोठय़ा प्रमाणावर असल्याने आग लवकर पसरली. याच परिसरात राज्य शासनाच्या ५० कोटी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत मोठय़ा संख्येत वृक्षलागवड करण्यात आली होती. ठिबक सिंचन आणि योग्य निगा राखल्यामुळे याठिकाणची वृक्षलागवड यशस्वी ठरत असतानाच ती या आगीच्या कक्षेत सापडली. या आगीमुळे मोठे राखीव वनक्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेसंदर्भात वृत्त प्रकाशित झाल्यानंतर न्यायालयाने दखल घेऊन जनहित याचिका दाखल करून घेतली. तसेच जंगलातील आगीच्या घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे, अशी विचारणा केली.

या परिसरातील इमारतीत सहाव्या मजल्यावर राहणारे किरण भोंडे पाटील यांना ही आग दिसताच ते घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, अग्निशमन विभागाची दोन वाहने याठिकाणी पोहोचली होती. मात्र, चारही बाजूने हा परिसर बंदिस्त असल्याने आणि प्रवेशाचे मोजकेच मार्ग असल्याने या वाहनांना आत जाता आले नाही. भोंडे यांनी त्यांना मार्ग दाखवला आणि ही वाहने आत गेली.