हिंगणा कार्यशाळेत पहिली बस विकसित

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंहामंडळाच्या (एसटी) हिंगणा कार्यशाळेने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  अद्ययावत बस विकसित केली आहे. त्यात १५ ते २० सेकंद फिरणाऱ्या व्यक्तीचे निर्जंतुकीकरण होऊ शकेल. प्राथमिक स्वरूपात ही बस करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसाठी वापरली जाणार आहे.

नागपूरसह विदर्भात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. दुसरीकडे टाळेबंदीमुळे सध्या एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. त्यामुळे एसटीने या बंद काळात करोनाचा प्रादुर्भाव रोखणाऱ्या डॉक्टरांसह पोलीस व इतरांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत एसटीचे महाव्यवस्थापक, यंत्र खात्याकडून नागपूरच्या मध्यवर्ती कार्यालय हिंगणा कार्यशाळेला  निर्जंतुकीकरण करणारी बस विकसित करण्याची सूचना केली.

सध्या ५ टक्के कर्मचाऱ्यांना बोलावले जात आहे. तरीही कमी कर्मचाऱ्यांत  १३ एप्रिलपासून ही बस विकसित करण्याचे काम सुरू झाले. १६ एप्रिलला ही बस तयार झाली. या ४४ आसन क्षमतेच्या बसला एकच दार आहे. प्रारंभीपासून मध्यभागापर्यंत ही यंत्रणा लावली आहे.

यात  १५ ते २० सेकंदात निर्जंतुकीकरण करता येईल. विशेष म्हणजे, फारसा खर्च न करताच ही बस  विकसित झाली आहे.

त्यासाठी कार्यशाळा व्यवस्थापक अनंत खैरमोडे, अधीक्षक कोच प्रमोद झाडे, संजय मुळक, प्रशांत नेवाल, रमेश पूरमवार प्रयत्न करत आहेत.